उकाडय़ात वाढ झाल्याने ग्रामीण भागातील वीजग्राहक अघोषित भारनियमनाने हैराण झाले आहेत. तरीही वीज बिलांतील आकडय़ांमध्ये कोणताही उतार आलेला नाही.

पनवेलच्या ग्रामीण परिसरामधील हरिग्राम व केवाळे या दोन गावांतील ग्रामस्थ व रहिवाशांची ही व्यथा आहे. गावाशेजारी नव्याने बांधलेल्या इमारतींमध्ये मोठय़ा प्रमाणात रहिवासी राहण्यास आले असताना पनवेलचे विजेचे विदारक चित्र या रहिवाशांना अनुभवावे लागत आहे.

पनवेलमध्ये प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्याने ३० लाख रुपयांमध्ये एक खोली व स्वयंपाक खोली व ४५ लाख रुपयांमध्ये दोन खोल्या व स्वयंपाक खोली या दराने रहिवाशांनी मुंबईहून येथे स्थलांतर केले. परंतु विमानतळाच्या पूर्वी येथील रहिवासी विजेच्या त्रासाला वैतागले आहेत. रोज दिवसांतून २५ वेळा वीज येजा करत असल्याची तक्रार येथील रहिवासी जे. एस. राव यांनी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. तरीही हे अधिकारी या रोजच्या वीज गुलच्या तक्रारीचा कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचा आरोप राव व इतर रहिवासी करत आहेत. हरिग्राम केवाळे येथे फोच्र्युन, ऑर्केड व कॅलेप्सी अशा तीन इमारतींमध्ये सुमारे ७५ कुटुंबांना महिन्याला सरासरी महावितरण कंपनीकडून मिळणारे २ ते ४ हजार रुपये वीज बिल वेळीच भरूनही हा त्रास सहन करावा लागत असल्याचे या रहिवाशांचे मत आहे.

या गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये काही जेष्ठ नागरिक राहतात. ते आजारी असल्याने त्यांना या वीज गुल होण्याचा मोठा त्रास जाणवत असल्याचे या रहिवाशांचे मत आहे.

या परिसराची जबाबदारी महावितरण कंपनीचे साहाय्यक अभियंता जे. एस. सूर्यवंशी यांच्यावर आहे. येथे ४५ गावांमधील १२ हजार वीजग्राहकांना व्यवस्थित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने येथे १२ लाइनमन नेमले आहेत.

या गावांना वीजपुरवठा करणारी यंत्रणा जीर्ण झाल्याने या वीजग्राहकांची समस्या वाढली आहे. याबाबत महावितरण कंपनीचे सूर्यवंशी यांनी संबंधित गावांचे पावसाळापूर्व वीजवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने काही वेळासाठी वीजप्रवाह बंद झाला असल्याचे सांगितले. मात्र आता यापुढे दुरुस्तीचे काम संपल्याने यापुढे या परिसराचा वीजप्रवाह खंडित होणार नाही असे सूर्यवंशी यांनी सांगितले.