स्वत:च्या मालकीचे धरण आणि सध्या पावसाळा सुरू असूनही पनवेलमधील रहिवाशांच्या घशाला पाण्याविना कोरड पडली आहे.

२४ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असताना नगरपालिकेच्या धरणातील पाणी संपल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून उसनवारी करावी लागत आहे. यातही संपूर्ण पाणी उपलब्ध होऊ न शकल्याने दोन महिन्यांपासून एका दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता; मात्र गेले पाच दिवस हा पाणीपुरवठा मंदावला आहे.

प्राधिकरणाच्या पंपांमधील बिघाडामुळे हे घडल्याचे पालिकेने सांगितले. सध्या पाच एमएलडी पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे उर्वरित पुरवठय़ावर काही मिनिटांसाठी पाणी मिळत आहे; अशोकबाग, बावनबंगला परिसरात सध्या ठणठणाट आहे. त्यामुळे बाहेर पाऊस आहे; पण घरात कोरडेठाक अशी स्थिती झाली आहे.

पावसाला उशीर झाल्याने देहरंग धरणात मुबलक पाणी जमा झालेले नाही आणि धरणातील गढूळ पाण्याचा वापर कसा करावा, हा प्रश्न पालिकेला पडला आहे.

याबाबत पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे म्हणाले, की पावसाच्या उशिराच्या आगमनामुळे देहरंगमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या मिळणाऱ्या पाणीपुरवठय़ावर पनवेलकरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पुरवठय़ासाठीच्या यंत्रणेत दुरुस्ती काम सुरू असल्याने तीन दिवसांपासून पाणीपुरवठा कमी प्रमाणात होता. मंगळवारी रात्रीपर्यंत तो पूर्ववत होईल. त्यानंतर एक दिवसाआड पाणी मिळेल. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढून पाणी मोठय़ा प्रमाणात साचल्यावर पाण्यात गाळ खाली गेल्यानंतर पाणीपुरवठा धरणाच्या पाण्यातून होऊ शकेल. या प्रक्रियेला अंदाजे १० ते १५ दिवस लागतील.

वाढदिवशी पाणी द्या..

पनवेल व उरण तालुक्यांच्या राजकारणामध्ये ठाकूर व पाटील हे दोन आपसातील मुख्य विरोधक राजकीय नेते आहेत. याच दोन नेत्यांच्या अवतीभवती दोनही तालुक्यांतील राजकारण व सत्ताकेंद्रे फिरत असतात. विशेष म्हणजे या दोनही नेत्यांचे वाढदिवस जून महिन्यातच येतात. वाढदिवसा वेळी लोकाभिमुख उपक्रम राबवून समाजोपयोगी उपक्रम करावा यासाठी हे दोनही नेते वाढदिवस साजरे करतात. त्याची फलकबाजी दोनही तालुक्यांच्या चौकाचौकांमध्ये केली जाते. या दोनही नेत्यांच्या शब्दाला जागणारे कार्यकर्ते तेवढेच कट्टर आहेत. त्यामुळे या दोनही नेत्यांनी एकत्र येऊन लोकशक्तीचा वापर पनवेल व उरणकरांची तहान भागविण्यासाठीच करून हे पाणी संकट तडीस लावतील अशी सामान्यांची अपेक्षा आहे.