गवाणकरांचे सरकारला आवाहन
नाटकाच्या पडद्यामागील रंगकर्मीच्या घरांसाठी सरकारने पनवेलमध्ये भूखंड द्यावा असे आवाहन ९६व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी रविवारी पनवेलमध्ये केली.
येथील कांतीलाल प्रतिष्ठानतर्फे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात गवाणकर यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. राज्यातील प्रत्येक बोलीभाषेला मानाचे स्थान मिळण्यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने बोलीभाषेतील नाटय़ स्पर्धा घ्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. गवाणकरांनी त्यांचे पनवेल व चिरनेर गावांशी असलेले घट्ट नाते या वेळी विशद केले. या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, आर. सी. घरत, जगदीश गायकवाड, शिवसेनेचे बबन पाटील आदी उपस्थित होते.