टाळेबंदीत विक्रीचे जुने तंत्र; दलालांची भिंत ओलंडली

लोकसत्ता, विकास महाडिक

नवी मुंबई : राज्यातील प्रमुख बाजार समितीतील फळ व्यापाऱ्यांकडे हापूस आंबा सोपवून ‘निर्धास्त’ होणाऱ्या कोकणातील हजारो हापूस आंबा बागायतदारांनी यंदा टाळेबंदीच्या संकटामुळे का होईना दलाल व खरेदीदारांची भिंत ओलांडल्याचे दिसून येत आहे. कोकणातील बागातयदारांना थेट विक्रीचे जुने तंत्र अवलंबले असून अक्षय्य तृतीयानंतर आतापर्यंत दीड लाखपेक्षा जास्त पेटय़ांची विक्री केली आहे. तेवढय़ाच पेटय़ा येत्या १५ दिवसांत विकण्याची तयारीही ठेवली आहे. यामुळे १२५ कोटींपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक उलाढाल होईल, असा अंदाज हे बागायतदारांनी व्यक्त केला आहे.

ऑक्टोबर महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस, कडाक्याच्या थंडीचा अभाव आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा हापूस आंब्याचा हंगाम दोन महिने उशिरा सुरू झाला होता. त्यात पहिल्या हंगामाचा हापूस बाजारात विकण्याची वेळ आणि करोना विषाणूचा प्रादुर्भाव एकाच वेळी जुळून आल्याने यंदा हापूस आंब्यावर अस्मानी संकट ओढवणार अशा भीती बागायतदारांना होती. त्याच वेळी राज्याच्या कृषी व पणन विभागाने टाळेबंदी काळात कोकणातील हापूस आंब्याची थेट विक्री करण्यास प्रोत्साहन दिले.

त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या मोठय़ा शहरापुरती ही विक्री न होता अकोला, जळगाव यांसारख्या शहरामध्येही यंदा विक्री केली. चोपडय़ात आतापर्यंत एक हजार ३०० डझन हापूस विकला गेला आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी अशा प्रकारची थेट विक्री या शहरामध्ये झाली नसल्याचे पणन अधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले. जुलै २०१६ मध्ये राज्य शासनाने हापूसच्या थेट विक्रीला परवानगी दिली आहे, पण कोकणातील बागायतदारांनी त्याचा फारसा फायदा करून घेतला नाही. बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे आंबा सोपवून ते देतील त्या भावावर बागायतदार समाधानी होते, मात्र टाळेबंदीमुळे कोकणात अडकून पडलेल्या बागायतदारांनी पारंपरिक विक्रीचे तंत्र झुगारून करोनाच्या संसर्गाला न घाबरता थेट विक्री सुरू केली. त्यामुळे राज्यात दीड लाख पेटय़ांची विक्री झाली असून तेवढीच अजून विक्री होण्याची शक्यता आहे.

ग्राहकाला दोन ते अडीच हजार रुपयांत घरपोच पाच ते सहा डझन आंबे मिळत असल्याने याला प्रतिसादही चांगला आहे. त्यामुळे सुमारे १२५ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापाऱ्यांची दलाली व खरेदीदारांची गेली अनेक वर्षांची साखळी तोडण्यात बागातयदारांना यश आल्याचे कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांचीही ऑनलाइन हापूस विक्री

* तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ बाजारातील व्यापाऱ्याकडून ऑनलाइन हापूस आंब्याची विक्री करून ग्राहकांना घरपोच हापूस आंबा पुरवठा केला आहे. मागील महिनाभर ही घरपोच सेवेला चांगलाच प्रतिसाद लाभला असून बाजारातील सुमारे २० ते २५ व्यापाऱ्यांनी २५ हजार डझन हापूस आंब्याचा स्वाद ग्राहकांना दिला आहे.

* ऑनलाइन ऑर्डर नोंदविल्यानंतर त्या पत्त्यावर घरपोच किंवा सोसायटीच्या प्रवेशद्वारापर्यंत हापूस आंबा विकले गेले आहे. बाजारात असे २० ते २५ व्यापारी ऑनलाइन विक्री करीत असल्याचे समजते. हापूस आंब्याचे पॅकिंग, त्याची वाहतूक आणि डिलिव्हिरी या तीन पद्धतीने विक्री केली जात असून वाहनांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. आम्ही या काळात दीड हजार डझन हापूस आंबा घरपोच विक्री केल्याचे देव फ्रेश रिटेल सव्‍‌र्हिसेसचे संचालक देविदास मुळ्ये यांनी सांगितले.