राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनीही फक्त १२ युनिट रक्त संकलन

नवी मुंबई</strong> : करोनामुळे दोन वर्षांत गरजेपेक्षा रक्त संकलन कमी होत आहे. त्यात आता साथीचे आजार बळावल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा भासत आहे. आतरयत ३५०० युनिट्स रक्त संकलन झाले आहे. मात्र महापालिका रुग्णालयांची वर्षांची गरज ही  ५ हजार युनिट्सची आहे.

शुक्रवारी राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस होता. या दिवशी रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा प्रशासनाला होती. मात्र त्यांची निराशा झाली आहे. फक्त १२ रक्तदाते पुढे आले. यात ४ ते ५ रक्तदाते हे रुग्णालयांचे कर्मचारी होते. यात फक्त १२ युनिट्स रक्त संकलन झाले. या दिवशी ही परिस्थिती तर पुढील काळात रक्तसंकलन कसे होणार हा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.

करोनामुळे ऐच्छिक रक्तदान तसेच संस्थेच्या माध्यमातून होणारे रक्तदान शिबिरे ही अत्यल्प प्रमाणात होत आहेत. त्यात आतापर्यंत शहरातील १ लाख ७,१५१ जणांना करोनाची बाधा झालेली आहे. हे लोक रक्तदानासाठी पुढे येत नाहीत. तसेच महाविद्यालय बंद असल्याने तसेच संस्थेच्या माध्यमातून रक्तदाते कमी झाले आहे. त्यामुळे रक्त संकलनावर परिणाम झाला आहे. महापालिका रुग्णालयामार्फत करोना काळापूर्वी दर आठवडय़ात २ ते ३ रक्तदान शिबिर होत होती. आता १५ दिवसांतून एकदा शिबीर होत आहे. त्यामुळे महिन्याला ५०० युनिट्स संकलित होणारे रक्त आता २०० ते २५० युनिट्स होत आहे. परिणामी वर्षांला ५ हजार युनिटची गरज भासत असून मागील वर्षी फक्त २ हजार ५०० तर यंदा आतापर्यंत फक्त ३ हजार ५०० युनिट रक्तपेढय़ांमध्ये रक्तसाठा आहे. गरजेपेक्षा कमी रक्तसंकलन होत असल्याने प्रशासनापुढे चिंता आहे. 

साथीच्या रुग्णांना प्लेट्लेट्सची गरज भासते. सध्या साथीचे रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे रक्ताची गरज अधिक भासत आहे. मात्र सध्या महाविद्यालय बंद आहेत इतर संस्थेच्या वतीने ही कमी रक्तदाते मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत: पुढे येऊन ऐच्छिक रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. दर तीन महिन्याने रक्तदान करता येते, त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे.

डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी, प्रथम संदर्भ रुग्णालय वाशी

गरज

* वार्षिक : ५ हजार युनिट  

* मासिक :  ५०० युनिट   

रक्त संकलित

* २०२० : २५०० युनिट        

* २०२१ : ३५०० युनिट