करावे गावाजवळील मैदानात लग्नाच्या वऱ्हाडींची वाहने उभी करण्यास विरोध

करावे गावातील गणपतशेठ तांडेल मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या विवाह सोहळ्यादरम्यान स्थानिक क्रिकेट संघातील खेळाडूंनी मैदानावर गाडय़ांची बेकायदा पद्धतीने वाहने उभे केल्यावरून नवरदेवाची वरात तासभर अडवल्याचा प्रकार घडला आहे. खेळाचे मैदान, प्रदर्शनी मैदान आणि उद्यान अशी विभागणी झाली असली तरी विवाह सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडींची वाहने नेमकी कुठे उभी करायचा, हा मुद्दा उपस्थित होत आहे.

नवी मुंबईतील करावे गाव परिसरातील गणपतशेठ तांडेल मैदानावर मोठमोठे लग्नसोहळे राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम होतात रविवारी सायंकाळी या मैदानावर अंकुश वैती यांची मुलगी शृखंला आणि दैवत चौधरी यांचा विवाह सोहळा पार पडला. त्याच वेळी या मैदानाच्या काही भागात करावे गावातील दोन संघ क्रिकेट खेळत होते. विवाहस्थळी आलेले पाहुण्यांची वाहने त्यांनी खेळाच्या मैदानात प्रवेश  करू दिला नाही. त्यामुळे पाहुण्यांबरोबर नवरदेवाची वरातही अडकून पडली.  वाहनांच्या  अडकवून करणाऱ्या तरुणांची मनधरणी करण्यासाठी काही स्थानिक नागरिक गेले असता, वाहनांमुळे क्रिकेटचे मैदान खराब होत असल्याचे सांगून स्थानकांनी  विरोध दर्शवला.

महापालिकेला मैदानाचे रितसर भाडे भरूनही ही परवड झाल्यामुळे लग्नाच्या आयोजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गणपतशेठ तांडेल याभव्य मैदानाचे तीन भाग करण्यात आले आहेत. या  मैदानावर २२ हजार चौरस मीटरचे खेळाचे मैदान, दहा हजार चौरस मीटरचे प्रदर्शनी मैदान आणि साडेचार हजार चौरस मीटरचे उद्यान असे तीन भाग करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठमोठय़ा कार्यक्रमांच्या आयोजकांची अडचण होऊ  लागली आहे. नेरुळ सेक्टर १९-अ  येथील हावरे मॉलच्या मागे असलेल्या मैदानांवर विवाह सोहळ्याच्या वेळी अशीच समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर पुन्हा करावेमधील प्रकार उघडकीस आला आहे.

गणपतशेठ तांडेल मैदानावर सुरुवातीला तेथील स्थानिक खेळाडुंनी पिच खराब होते म्हणून वाहने उभी करण्यास विरोध केला होता. मात्र नंतर काही नागरिकांनी मध्यस्थी केली आणि वाहने तांडेल मैदानात करण्यात आली. त्यानंतर विवाहसोहळा पार पडला.

वाहने उभी कुठे करायची?

करावे येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानात रविवारी  लग्नसोहळा पार पडला. त्याचे रितसर शुल्क पालिकेला  दिले होते. शेजारच्या खेळाच्या मैदानावर वाहने उभी करण्यास अडवणूक होते. तर  पालिकेने प्रदर्शनी मैदानाची शुल्क आकारणी करताना वाहने उभी करण्याची सोय  पालिकेने करून दिली पाहिजे, अन्यथा नागरिकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. त्यामुळे पालिकेने याबाबत योग्य सुविधा दिली पाहीजे, असे मत नागरिक करीत आहेत.

करावे येथील तांडेल मैदानात घडलेल्या प्रकाराबाबत योग्य ती माहिती घेण्यात येईल. जर आर्थिक अडवणूक होत असेल तर तो चुकीचा प्रकार आहे. असे घडले असल्यास  महापालिका  योग्य ती कारवाई करेल. -दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त मालमत्ता विभाग