शहरातील ७८ मैदाने खुली करण्याची महापालिकेकडे मागणी

 नवी मुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणानंतर शहरातील उद्याने, मैदाने खुली झाली मात्र ती फक्त ठरावीक वेळत चालने, व्यायाम, सायकलिंगसाठीच. मात्र खेळांसाठी मैदाने बंदच आहेत. त्यामुळे खेळायचे कुठे असा प्रश्न विचारला जात असून मैदाने खेळांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे.

खरंतर याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेणे अपेक्षित असताना नवी मुंबईतील मैदानांबाबत शासनाची नियमावली लागू आहे. त्यामुळे खेळांसाठी असलेली ७८ मैदाने खेळासाठीच वापरता येत नाहीत. याबाबत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना विचारले असता, स्थानिक पातळीवर याबाबत तातडीने निर्णय घेत ही मैदाने खेळांसाठी खुली करण्यात येतील असे सांगितले.

नवी मुंबईत करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे सद्यस्थितील शहरातील सर्व व्यवहार पूर्वपदावर सुरू आहेत. शासनाने शिथिलीकरण करताना उद्याने व मैदानांबाबत ती खुली करण्यास परवानगी दिली. मात्र तेथील खेळांसाठी ती खुली केली नाहीत. त्यामुळे नवी मुंबईत मैदाने व उद्याने ही केवळ व्यायाम, चालणे, धावणे व सायकलिंगसाठी सकाळी ५:३० ते १० व सायंकाळी ५ ते ९ या वेळात खुली असतात.

नवी मुंबई शहरात ८ विभाग कार्यालयाअंतर्गत ७८ मैदाने आहेत. पालिकेने शहरात राजीव गांधी स्टेडियमसह यशवंतराव चव्हाण क्रिडांगण अशी अनेक मैदाने खेळासाठी विकसित केली आहेत. मुले एकीकडे ऑनलाइन शिक्षणामुळे कंटाळली असून दुसरीकडे त्यांनी खेळायचे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.  मैदानावर र्निबध असल्याने खेळाच्या स्पर्धाही घेता येत नाहीत. शहरभर करोना नियम पायदळी तुडवत असताना खेळाचेच सरकार व पालिकेला का वाकडे आहे असा प्रश्न आहे. त्यामुळे इतर मैदानांबरोबर राजीव गांधी मैदान खेळासाठी स्थानिक मुलांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी नगरसेविका स्वाती गुरखे यांनी आयुक्तांकडे केली आहे. तर राजीव गांधी मैदानात चित्रीकरणाला परवानगी पण खेळाला बंदी हा प्रकार चुकीचा असून आम्हाला पूर्वीप्रमाणे हे मैदान खेळासाठी उपलब्ध करून द्यावे असे स्थानिक रहिवासी सुहास औताडे यांनी सांगितले.

मुलांनी खेळायचे कुठे? शहरात सर्वत्र गर्दीच गर्दी होत असताना मैदाने मात्र नियमावलींच्या चौकटीत बंद आहेत. खेळाच्या मैदानांबाबतचे नियम तात्काळ हटवले पाहिजेत. मैदाने बंद ठेवून खेळाडू कसे तयार होणार?

देवनाथ म्हात्रे, अध्यक्ष, एकता कला, क्रीडा मंडळ 

शहरातील खेळांची मैदाने काही ठरावीक वेळेतच खुली करण्याची शासनाची परवानगी आहे. परंतु स्थानिक पातळीवर याबाबत तात्काळ निर्णय घेऊन खेळाची मैदाने खेळासाठी खुली करण्यात येतील.

अभिजीत बांगर,आयुक्त, महापालिका