पंचशील को-ऑपरेटिव्ह सोसायटी, ऐरोली
‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावे प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती’ या उक्तीनुसार सेक्टर-२ येथील ऐरोली पंचशील कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील सुशिक्षित ३८ मित्रांनी एकत्र येऊन १९८६-८७ च्या वर्षांत टेंण्डर प्लॉटवर वसवलेले हे टुमदार घरकुल. या घरकुलात ए,बी आणि सी अशा तीन विंग आहेत. एमध्ये १४, बीमध्ये १२ आणि सीमध्ये १२ अशी एकूण ३८ कुटुंबे राहतात. इमारतीच्या प्रवेशद्वारावर कमनीय पद्धतीने लोंबत असलेल्या वेली. चारही बाजूंनी विविध प्रकारची हिरवीगार गर्द झाडे शांत आणि शीतलतेचा प्रत्यय देतात. त्यामुळे घरी आल्यानंतर शिणवटा कुठच्या कुठे पळून जातो. प्रत्येक इमारतीच्या दर्शनीय भागात भिंतींवर पाणी, वीजबचतीचे जागृतीपर संदेश लिहिण्यात आले आहेत. मध्यवर्ती भागातील मोकळ्या जागेत पेव्हरब्लॉक बसवून त्यावर मुलांना खेळण्यासाठी बॅडमिंटन कोर्टची व्यवस्था करण्यात आली आहे.
आजकालच्या तंत्रस्नेही युगात पारंपरिक खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मध्यवर्ती भागात भव्य तुळशी वृंदावन पावित्र्याची साक्ष देते. तुळशीसमोर रोज सायंकाळी येथे तुपाचा दिवा पेटवला जातो. सोसायटीत गणेशोत्सव, ख्रिसमस, दसरा आणि दिवाळी सण मोठय़ा उत्साहाने साजरे केले जातात. या सणाच्या माध्यमातून मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि खेळांबरोबरच स्त्रीभ्रूण हत्या, बालसंगोपन, ज्येष्ठांसाठी वाहतुकीचे नियम, राष्ट्रीय सणांच्या वेळी स्वातंत्र्य, गडे-किल्ले, शहिदांच्या बलिदानांचे महत्त्व पटवून देण्यात येते. येथील सदस्य असलेल्या दोन शिक्षिका या कार्यक्रमांची आखणी करतात. आवारात एका बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी छोटेसे पार्क साकारण्यात आले आहे. यात घसरगुंडी व झोक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सायंकाळी महिला आणि लहान मुलांची झुंबड उडालेली असते. आपत्कालीन सेवांचे नंबर इमारतीच्या प्रवेशद्वारावर तसेच प्रत्येक घरात लिहून ठेवण्यात आले आहेत. अडीअडचणींच्या वेळी हे सभासद कुटुंबसदस्यांसारखे एकमेकांना मदत करतात. या सोसायटीला सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २००४-०५ साली स्वच्छ सोसायटी म्हणून ऐरोली भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
ओला आणि सुका कचरा
सोसायटीत ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण वैयक्तिक पातळीवर करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने ओल्या कचऱ्यासाठी दोन, तर सुक्यासाठी दोन डबे देण्यात आले आहेत. रहिवाशांची फलक लावून याविषयी जनजागृती केली आहे, तसेच ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.
पार्किंगसाठी जागा
सोसायटीत पार्किंगसाठी जागा- रहिवाशांबरोबरच भाडेकरूंना सोसायटीतच पार्किंगची सोय करून देण्यात आली आहे. यासाठी भाडेकरूंकडून अधिकचे पैसे घेतले जातात. त्यामुळे इमारतीबाहेर पार्किंगची रांग लागण्याचा प्रश्न संभवत नाही.
महिलांना प्राधान्य
समितीच्या सदस्यांमध्ये महिलांना सामील करून घेऊन महिलांच्या गुणांना प्राधान्य देण्यात येते. याशिवाय रहिवाशांना तक्रारी मांडण्यासाठी तळमजल्यावर असलेल्या कार्यालयात ‘ड्रॉप बॉक्स’ ठेवण्यात आला आहे.
पूनम धनावडे