पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेला नवे तंत्रज्ञान प्राप्त झाले आहे.​ सरकारच्या टांकसाळ या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर निधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे, खारघर, कळंबोली आणि पनवेल शहर येथील चार आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक एक्स-रे यंत्रणा बसविण्यात ​येणार असून ​ही सेवा लवकरच कार्यान्वित होणार ​असल्याने नागरिकांना शहरातील आरोग्य केंद्रांमध्ये मोफत एक्स रे काढता येणार आहे.

या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून पुढील काही दिवसांत या सर्व केंद्रांतील एक्स-रे यंत्रणा सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर लोकार्पणाचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केला जाणार आहे.

​केंद्र सरकारच्या टांकसाळ कंपनीने एक्स रे यंत्र खरेदी करून महापालिका क्षेत्रात देण्यात स्वारस्य दाखविल्यावर यासाठी तीनवेळा निविदा प्रक्रिया पार पडली. मात्र तांत्रिक अडचणी पार पडल्यानंतर अखेर चौथ्यांदा पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत अडोनीस या कंपनीकडून एक्स रे मशीन खरेदी करण्याचे निविदा प्रक्रियेत ठरले. एक कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च यासाठी केला जाणार आहे. एक्स रे मशीन हाताळण्यासाठी लागणारे तंत्रज्ञांची तरतूद महापालिकेने केली आहे.

महापालिकेने क्षयरोगमुक्त पनवेलचे उद्दिष्ट ठेवून मागील दीड महिन्यांपूर्वी व्यापक रुग्ण शोध मोहीम राबविली होती. या मोहिमेदरम्यान सुमारे​ ४५ हजार संशयित रुग्णांचे ​एक्स-रे परीक्षण​करण्यात आले. त्यासाठी खासगी निदान केंद्रांबरोबरच (डायग्नोस्टिक सेंटर) महापालिकेकडील ​पोर्टेबल एक्स-रे यंत्रांचा वापर करण्यात आला होता.

आता या​ नवीन चार आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी एक्स-रे यंत्रणा कार्यान्वित झाल्याने​ कळंबोली, कामोठे, खारघर आणि पनवेल शहर या उपनगरांमध्येच क्षयरोग निदान आणि उपचार प्रक्रियेला मोठी गती मि​ळेल तसेच फुफ्फुसासंबंधी व इतर हाडांच्या विकारांमध्येही नागरिकांना तत्काळ तपासणीची सुविधा मिळणार आहे.

​एक्स रे यं​त्रांचा वापर केवळ क्षयरोग तपासणीसाठीच नव्हे, तर विविध वैद्यकीय उपचारांमध्ये आवश्यक असलेल्या नियमित एक्स-रे तपासणीसाठीही​ आवश्यकतेनूसार केला जाईल. या उपक्रमामुळे पनवेल महापालिकेची प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि जनसामान्यांसाठी उपलब्ध होणार ​आहे. – डॉ. आनंद गोसावी, ​मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका ​