पनवेल – आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खारघर, कामोठे, कळंबोली आणि खांदेश्वर परिसरातील कॉस्मोपॉलिटन मतदारांना एकत्र करण्यासाठी कॉलनी फोरमने उभारलेली नागरी चळवळ आता अधिक प्रभावी होत आहे. शहराची तहान भागविण्यासाठी अपयशी ठरलेल्या भाजप सत्ताधाऱ्यांविरोधात नागरिकांची मोट बांधण्याचा फोरमचा प्रयत्न रविवारच्या निर्धार मेळाव्यात स्पष्टपणे जाणवला. कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड या कार्यक्रमाला वैयक्तिक कारणास्तव अनुपस्थित होत्या, मात्र त्यांच्या नेतृत्वाची छाप संपूर्ण मेळाव्यात जाणवत होती.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि भाजप दोन्ही राजकीय पक्षांतून निवडणूक लढविल्याचा त्यांचा अनुभव आणि गेल्या विधानसभा व महापालिका निवडणुकांतील मोठी मतसंख्या लक्षात घेता त्यांच्या भूमिकेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र ठाकरे गटाचे उमेदवार स्पर्धेत असल्यास फोरमचे धोरण काय, याबाबत या मेळाव्यात अद्याप स्पष्टता दिली गेली नाही. आरक्षण सोडत पूर्ण होण्यापूर्वीच फोरमने इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर केल्याने काही राजकीय वर्तुळांत आश्चर्यही व्यक्त होत आहे.
कामोठे कॉलनी फोरमतर्फे आयोजित हा निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. नागरिकांनी प्रलंबित समस्या, अपुरा पाणी पुरवठा, अखंडीत वीज पुरवठ्याचा प्रश्न, खड्डेमय रस्ते, आरोग्यासाठी हक्काच्या रुग्णालयाचा अभाव, महापालिकेची स्वत:ची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिकांना करावा लागणारा महागडा व असुरक्षित प्रवास, आणि मलनिस्सारणातील अशुद्ध पाण्यामुळे उद्भवलेली स्थिती अशा मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर मेळाव्यात नागरीकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला.
कॉस्मोपॉलिटन लोकसंख्या बहुसंख्य असलेल्या या शहरात विकास कामांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे पर्यायी नेतृत्वाची मागणी जोर धरत आहे.फोरमने जाहीर केलेल्या माहितीनुसार, कामोठे शहरातील ११ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी सुशिक्षित, समाजाभिमुख आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. पैशाच्या अमिषाला बळी न पडता केवळ विकास आणि नागरिकांच्या हक्कांसाठी निवडणूक लढवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.
फोरमतर्फे मांडलेले प्रमुख मुद्दे
अन्यायकारक मालमत्ता कर कमी करणे, खड्डेमुक्त रस्ते, शाश्वत जलपुरवठा, सार्वजनिक आरोग्य केंद्र, वाहतूक सुविधा, अग्निशमन केंद्र सुरु करणे, उद्याने व क्रीडांगणे दुरुस्ती, शुल्क नियमन आणि मलनिस्सारणातील सूसुत्रीकरण.नागरिकांनीही स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकपणा आणि उपलब्धता या निकषांवर उमेदवार निवडण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त केला.
कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव यांच्या नेतृत्वाखाली, तसेच खारघर कॉलनी फोरमसह विविध संघटनांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी खारघर कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक मधू पाटील, महिला अध्यक्षा जयश्री झा, ऍड. समाधान काशीद, बापू साळुंखे, अनिल पवार, पोपट आवारी, निलेश आहेर, जयवंत खरात, प्रवीण भालतडक, गीता कुडाळकर, शुभांगी जाधव, उषाकिरण शिंगे, मुक्ता घुगे आणि शीतल दिनकर, सुप्रिया माने व्यासपीठावर उपस्थित होते.
