पनवेल : पनवेल तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात नळातून पाणी पुरवठा करण्यासाठी राबविल्या जात असलेल्या ‘जल जीवन मिशन’ योजनेला घरघर लागल्याचे चित्र पाहायाला मिळत आहे. भाजपचे पनवेल येथील आमदारांनी ही योजना मार्गी लावावी यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. अधिकाऱ्यांची कानउघडणी केली, मात्र त्याचा फारसा लाभ होताना दिसत नाही. पनवेल तालुक्यातील १३३ पैकी अवघ्या १४ योजना आतापर्यंत शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती उजेडात आली आहे.

आदई गावातील ग्रामस्थांनी याविषय़ी पनवेल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर ही माहिती समोर आली. आदई गावामध्ये इमारतींमध्ये वास्तव्याला आलेले रहिवासी दोन वर्षांपासून पनवेल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे पाणी पुरवठा योजना तातडीने राबविण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. या रहिवाशांनी अनेकदा आंदोलने केली, बैठका घेतल्या मात्र सरकारी अधिकाऱ्यांची या कामाप्रती असलेल्या अनास्थेमुळे हे काम मार्गी लागू शकले नाही. या रहिवाशांना अधिकाऱ्यांकडून आश्वासने दिली जात होती. अखेर या रहिवाशांनी माहिती अधिकाराचा वापर करुन पंचायत समितीच्या जल जीवन मिशन योजनेची माहिती मिळवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल तालुक्यामध्ये केंद्र व राज्य सरकारचे विविध मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. मात्र प्रत्येक घरात नळातून पाणीपुरवठा अद्याप होत नाही. आदई गावात पाणी पुरवठ्याची जल जीवन मिशन योजना यशस्वीपणे राबवावी यासाठी रहिवासी मागील अनेक वर्षांपासून झटत आहेत. गावासाठी शासनाने ४ कोटी ५३ लाख १० हजार ६४७ रुपयांची योजना जाहीर केली. अद्याप गावात जलवितरण वाहिनीचे काम सुरूच झाले नाही. उंच साठवणूक जलकुंभाचे काम अवघे ४ टक्के झाले. हे ४ टक्के काम म्हणजे फक्त खोदकामाचा खड्डा मारला आहे. तसेच गुरुत्व वाहिनीचे काम ३८ टक्के झाले. भूस्तर टाकीचे काम ८५ टक्के झाले आहे. मागील अनेक वर्षात आदई गावातील पाणी पुरवठा योजनेचे काम १२ टक्के एवढेच झाले आहे. ठेकेदाराला आतापर्यंत ३८ लाख रुपयांचे धावते देयकाप्रती दिल्याची माहिती उजेडात आली आहे.

कामांची स्थिती

  • जल जीवन मिशन योजनेतील १३३ पैकी ११ कामे ०.२५ टक्के झाली आहेत. तसेच २५ कामे ही २५ ते ५० टक्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत.
  • ४४ कामे ही ५० ते ७५ टक्के पूर्ण झाली आहेत. १६ कामे ७५ ते ९५ टक्के पूर्ण झाली आहेत.
  • ६ कामे ही ९६ टक्के पूर्ण झाली आहेत. एक काम ९७ टक्के तर ३ कामे ९८ टक्के पूर्ण झाली आहेत.
  • ९९ टक्के १३ कामे झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.