ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा, ऐरोली परिसर हा नवी मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. ऐरोली टोलनाका मार्गे आणि दिघा येथील मुकंद कंपनी परिसरातून नवी मुंबईत रोज हजारो वाहने ये-जा करतात. या परिसरातील एमआयडीसी व सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर भूमाफियांनी मोठय़ा प्रमाणात अनधिकृत इमले बांधले आहेत, पण पार्किंगसाठी जागा ठेवलेली नाही. त्यामुळे वाहने पार्क कुठे करायची, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या परिसरात सिडकोचे ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात असलेले वाहनतळ वगळता अन्यत्र कुठेही वाहनतळ नाही, त्यामुळे रहिवासी मनमानीपणे पार्किंग करत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने नो पार्किंग, सम विषम पार्किंगचे फलक शहरभर लावले आहेत. पण काही दुकानदारांनी हे फलकच गायब केले आहेत. वाहतूक शाखेकडून टोईगं व्हॅन कमी असल्याने मनमानी पार्किंग करणाऱ्यांचे फावले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. दिघा परिसरात महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या पाच प्रभागांचा व ऐरोली विभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या अठरा प्रभागांचा समावेश आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यांनतर नवी मुंबईचे बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघ असे दोन भाग पाडण्यात आले. मात्र ऐरोली विधानसभा मतदारसंघाचा विकास करताना ग्रामस्थांच्या आडमुठेपणामुळे आणि बेकायदा बांधकामांमुळे तेथील पार्किंगचा प्रश्न अनुत्तरितच राहिला. गावठाण भागात अनधिकृत टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या. पण पार्किंगची सोय करण्यात न आल्याने वाहने रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केली जातात. त्यामुळे गावठाणात पार्किंगचा बोजवार उडाला आहे. सिडको वसाहतीतील रो होऊसमध्ये तळ मजल्यावर पार्किंगची सोय करणे अपेक्षित असताना तिथे उद्योगंधदे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे रो हाऊसच्या बाहेर वाहने पार्क करण्यात येत आहेत.
दिघा परिसर औद्योगिक पट्टय़ाचे प्रवेशद्वार आहे, मात्र तिथेही सिडको, एमआयडीसी किंवा पालिकेने वाहनतळाची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे दिघा तलाव, रामनगर परिसर आणि रस्त्यांच्या दुतर्फा स्थानिक रहिवासी आणि बाहेरून आलेले नागरिक आपली वाहने बिनधास्त पार्क करतात. ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर वाहनतळ उभारले आहे. हे एकमेव पार्किंग क्षेत्र वगळता दिवा सर्कल, सहकार बाजार, ऐरोली सेक्टर ३ परिसर, जनता मार्केट, ऐरोली गाव परिसर अशा महत्त्वाच्या ठिकाणी आजही वाहनतळांची नितांत गरज आहे. (क्रमश)
वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन
दिवा सर्कल परिसरात ऐरोली आणि दिघा परिसरातील विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेर पोलीस टोइंग करून आणलेली वाहने ठेवतात. रबाले पोलीस चौकीत येणारे अधिकारी आणि कर्मचारीही पेट्रोलिंगच्या गाडय़ा भर रस्त्यात उभ्या करतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही पार्किंगचा प्रश्न भेडसावत असल्याचे दिसून येते.
अनधिकृत बांधकामे आणि उद्याने
शहराची निर्मिती करताना सिडकोने उद्याने, पार्किंग आणि क्रीडांगणांसाठी आरक्षित जागा ठेवल्या होत्या. मात्र दिघा, ऐरोलीतील रिकाम्या भूखंडांवर इमारती आणि चाळी उभ्या राहिल्या आहेत. अनेक लोकप्रतिनिधींनी उद्यानांच्या नावावर आपल्या प्रभागातील अनेक मोकळे भूखंड गिळंकृत केले आहेत. अनधिकृत प्रार्थनास्थळेही उभारली आहेत. ऐरोली परिसरात अनेक उद्याने झाली असून पार्किंगसाठी मात्र जागाच उरलेली नाही.
डॉ. आंबेडकर स्मारक परिसरात पार्किंग प्लाझा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबईमार्गे थेट ऐरोलीत येण्यासाठी ऐरोली खाडीपूल हा एकमेव मार्ग आहे. डॉ. आंबेडकर स्मारकाच्या परिसरात अनेक महाविद्यालये आणि शाळा आहेत, मात्र तरीही पालिकेने या भागात पार्किंगसाठी जागा ठेवलेली नाही.
शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर मनमानी
ऐरोली येथील सेक्टर २० मधील युरो स्कूल, सेक्टर १९ मधील एनएचपी स्कूल, दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, सेक्टर ६ येथील सेंट झेवियर्स स्कूल, सेक्टर ३मधील श्री राम विद्यालय, सेक्टर १९ मधील जे.व्ही.एम. मेहता विद्यालय या शाळा व महाविद्यालयांच्या बाहेर स्कूल बस तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची वाहने असल्याने शाळा-महविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी वाहतूक कोंडी होते.
सभागृहांच्या बाहेर वाहनांच्या रांगा
ऐरोली सेक्टर-१७ मधील महाराष्ट्र सेवा संघ, तेरापंथ हॉल, सेक्टर ५ येथील संत सावता माळी सभागृह, सेक्टर १८ येथील हेगडे भवन, सेक्टर २ मधील राजेश हॉल या सभागृहांत पार्किंगची सोय नसल्याने तिथे कार्यक्रम असल्यास रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात दुतर्फा वाहने पार्क केली जातात. याचा वाहतुकीत अडथळा येतो.
