ऐरोलीतील पालिका रुग्णालयात वाहनतळ व्यवस्था नसल्याने रुग्णालयात व बाहेर बेशिस्तपणे रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. याचा फटका रुग्णांना बसत असून रुग्णवाहिकांनाही गर्दीतून वाट काढावी लागत आहे.

हे रुग्णालय मध्यवर्ती ठिकाणी आहे. शाळा, महाविद्यालय, खासगी रुग्णालये, बाजारपेठ या ठिकाणी असल्याने हे ठिकाण नेहमी वर्दळीचे आहे. त्यात महापालिका रुग्णालयात येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठीही वाहनतळ नाही. त्यामुळे ही वाहने रुग्णालयालगत असलेल्या रस्त्यांवर उभी केली जात आहेत. आतील जागेतही वाहने उभी असतात. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात प्रवेश करताना यातून मार्ग काढत जावे लागत आहे. त्यात एखादी रुग्णवाहिका आली तर तिलाही आत येता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहनतळाची समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे. अनेक वाहने पदपथावरही उभी असतात.