कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांचे साटेलोटे पाहता मुंबई पालिकेने शहरात फोफावलेली पेव्हर ब्लॉक संस्कृती बंद करण्याचा निर्णय घेतला असून नवी मुंबई पालिका अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसलेले हे पेव्हर ब्लॉकचे भूत कधी उतरणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात आजही पदपथांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याची अनेक कामे सुरूआहेत. विशेष म्हणजे खासगी सोसायटी व कंडोनियम वसाहतीत पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्याने नवी मुंबईतील या संस्कृतीवर महालेखापरीक्षकांनी (कॅग)ने ताशेरे ओढले आहेत.
मुंबई पालिकेप्रमाणे नवी मुंबईतही पेव्हर ब्लॉक संस्कृती पायाभूत सुविधांचा एक अविभाज्य घटक झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर नजर जाईल तेथे पेव्हर ब्लॉकचे काम अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. नगरसेवकाने पेव्हर ब्लॉकची शिफारस करायची आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दहा लाख रुपयांच्या कामाचे चार तुकडे करून पेव्हर ब्लॉक बसवायचे, अशी एक कार्यप्रणाली नवी मुंबईत गेली अनेक वर्षे अंगीकारली गेली आहे.
पेव्हर ब्लॉकचे हे फिव्हर इतके वाढले होते की, नगरसेवकांनी काही खासगी सोसायटींच्या आवारातही पेव्हर ब्लॉक बसवून स्वत:च्या आगामी मतांची बिदागी जमा तर केलीच, पण कंत्राटदारांकडून चांगलाच मलिदा वसूल केल्याच्या अनेक सुरस कथा ऐकविल्या जात आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील बैठय़ा घरासमोरील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉकचे पेव फुटलेले असल्याने पावसाळ्याचे पाणी झिरपण्यासाठी एकही जागा शिल्लक नाही. त्यामुळे नवी मुंबईतील तापमान शेजारील शहरांच्या तुलनेत जास्त आहे.
जमिनीत पाणी झिरपण्याचे नैसर्गिक स्रोतच पालिकेने बुजवून टाकली आहेत. त्यामुळे शहरात मागील सोळा वर्षांत लाखो टन पेव्हर ब्लॉक बसविले गेले असून त्यावर करोडो रुपये खर्च केले गेले आहेत. पालिकेच्या या अनावश्यक खर्चावर भारतीय महालेखापरीक्षकांनी (कॅग) दहा वर्षांपूर्वी ताशेरे ओढले. त्यामुळे त्यानंतर हे खासगी दानधर्माचे काम पालिकेला थांबवावे लागले, मात्र आजही चौक, सिग्नल्सवर दिसला खड्डा की बसवले पेव्हर ब्लॉक असे चित्र कायम ठेवण्यात आल्याने सर्व चौक पेव्हरमय झालेले आहेत.
पदपथांच्या पेव्हर ब्लॉकचे तर किस्से मजेशीर असून हा पालिकेतील एक फार मोठा घोटाळा असल्याची चर्चा आहे. एका पदपथावरील जुना पेव्हर ब्लॉक काढून दुसऱ्या ठिकाणी बसविणे, जुन्या पेव्हर ब्लॉकना रंगरंगोटी लावून ते इतरत्र वापरणे हे तर अद्यापही सुरू आहे.
पेव्हर ब्लॉकच्या या गोरख धंद्यात अनेक कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने पेव्हर ब्लॉक कारखाने काढले असून पालिकेच्या या कामावर हे कारखाने पोसले जात आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी पेव्हर पराक्रम बंद केले असून नवी मुंबईतील हे पेव्हर उद्योग कधी बंद केले जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.