नागरी सुविधांसाठी खोदकाम; रस्ते, पुलांच्या बांधकामांमुळे पादचाऱ्यांचे हाल, वाहतूककोंडी

काँक्रीटीकरणाची कामे, मलनिस्सारण वाहिन्या, महानगर गॅसच्या वाहिन्या, जलवाहिन्या, भूमिगत विद्युत वाहिन्या इत्यादी कामांसाठी नवी मुंबईतील रस्ते ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना ज्या भागात काम सुरू आहे, त्या भागातून वाहतूक बंद ठेवली जाते. उरलेला अर्धा रस्ता हा वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येतो, मात्र एकाच दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी असलेल्या रस्त्यावरून दोन्ही दिशांकडे जाणाऱ्या वाहनांना ये-जा करण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते शिवाय वाहनचालकांमध्ये शब्दिक चकमकीदेखील होतात.

ऐरोलीत, ठाणे-बेलापूर मार्गावर, महापे, तुर्भे व गोठविली येथे पादचारी पुलांचे सुरू आहे. नेरुळ, शिरवणे गाव, एपीएमसी मार्केट ते तुर्भे गाव, रबाळे, महापे औद्योगिक पट्टा या भागातही रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. या कामांमुळे वाहनचालकांना व पादचांऱ्याना रस्ते बदलून प्रवास करावा लागतो. जिथे रस्त्यांची कामे सुरू आहेत तिथे पुढे रस्ता बंद आहे, असा फलकही लावण्यात येत नाही, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. रस्त्यांची कामे पूर्ण झाली तरी त्यासाठी वापरून शिल्लक राहिलेली रेती, वाळू आणि अन्य साहित्य तिथेच पडून रहते. त्यामुळे वाहने घसरतात आणि अपघात होतात.

महानगरपालिका, महाविरण, महानगर गॅस, रिलायन्स यांचा एकमेकांशी समन्वय नसल्यामुळे वेगवेगळ्या सेवांसाठी तेच रस्ते वारंवार खोदण्यात येतात. वीजवाहिन्या भूमिगत असल्यामुळे एखाद्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यास नेमका कुठे दोष आहे, हे शोधण्यासाठी रस्ता खोदण्यात येतो. हे खड्डे योग्य रीतीने बुजवण्यात येत नाहीत. रस्त्यांची कामे झाल्यानंतर पदपथांवर डेब्रिज आणि बांधकामातून शिल्लक राहिलेले साहित्य टाकण्यात येते.  रस्त्यांची कामे  वेळेत पूर्ण करण्यात यावीत, अन्य नागरी सुविधांसाठी खोदलेले रस्ते वेळेत पूर्ववत करावेत, पर्यायी मार्गाची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत आणि काम पूर्ण झाल्यावर साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.

समन्वयाचा अभाव

* महानगरपालिका, महाविरण, महानगर गॅस, रिलायन्स यांचा एकमेकांशी समन्वय नसल्यामुळे वेगवेगळ्या सेवांसाठी तेच रस्ते वारंवार खोदण्यात येतात.

* काम झाले, तरी खड्डे नीट बुजून रस्ते पूर्ववत केले जात नाहीत. कामानंतर शिल्लक राहिलेली रेती, वाळू आणि अन्य साहित्य तिथेच पडून रहते.

*  काम सुरू असल्याची माहिती देणारे फलक लावण्यात न आल्यामुळे वाहनचालकांना विनाकारण  हेलपाटा घालावा लागतो, व वाहतूक कोंडी होते.