चोरीच्या भीतीने पाणीही कडी-कुलपात

स्वतंत्र मोरबे धरणामुळे जलसंपन्न नवी मुंबईकरांना पाण्याचा वापर सर्रास करण्याची सवय लागली आहे.

झोपडपट्टी भागात पाणीटंचाईचा उद्रेक होण्याची शक्यता ; एमआयडीसीच्या साठ तास शटडाऊनचा फटका

एमआयडीसीच्या बारवी धरणातून नवी मुंबईच्या पूर्व बाजूस येणाऱ्या औद्योगिक व नागरी वसाहतीतील ४२ दशलक्ष लिटर पाण्यावर थेट ५० टक्के कपातीची कात्री लावण्यात आल्याने ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील कारखान्यांना तर घरघर लागली आहे, पण या भागात राहणाऱ्या सुमारे अडीच लाख नागरी वसाहतीतील रहिवाशांच्या सहनशीलतेचा कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची भीती येथील लोकप्रतिनिधी व्यक्त करीत आहेत. घरासमोर ठेवलेल्या पिंपातील पिण्याच्या पाण्याची चोरी होऊ नये यासाठी त्यांना टाळे ठोकले जात असून नगरसेवकांना प्रभागात घेराव घालण्याच्या घटना वाढल्या आहेत. मार्च महिना असताना ही स्थिती आहे, तर पुढील तीन महिन्यांत काय स्थिती होईल याची भीती नगरसेवक व्यक्त करीत आहेत.

स्वतंत्र मोरबे धरणामुळे जलसंपन्न नवी मुंबईकरांना पाण्याचा वापर सर्रास करण्याची सवय लागली आहे. यंदा सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नवी मुंबई पालिकेने तीस टक्के पाणीकपात केली आहे. या पाण्यावर नागरी वसाहतींना लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जात असताना पूर्व बाजूस असलेल्या एमआयडीसीच्या झोपडपट्टी भागात संतापाची लाट पसरू लागली आहे. एमआयडीसीने टाकलेल्या पूर्वीच्या जलवाहिन्या आणि नियोजनाचा भाग म्हणून पालिकेने या भागाला मोरबे धरणातून येणाऱ्या पाण्याच्या जोडण्या दिलेल्या नाहीत. त्याऐवजी एमआयडीसीकडून पाणी विकत घेऊन या भागाला ४२ दशलक्ष लिटर पाणी दिले जात आहे. यात तीन हजारपेक्षा जास्त छोटेमोठे कारखाने आणि ५२ हजार झोपडपट्टय़ांचा सहभाग आहे. बारवी धरणात यंदा केवळ ५६ टक्के पाणीसाठा असल्याने एमआयडीसीने या पाण्यावर जगणाऱ्या सर्व शहरांना ४० टक्के पाणीकपातीची कात्री लावली आहे. त्यामुळे डिसेंबरपासून ही कपात सुरू झाली असून कारखान्यांना त्याचा फटका बसू लागला आहे. या कारखान्यांच्या कुशीत असलेल्या अडीच लाख लोकवस्तीलाही या पाणीकपातीची धग जाणवू लागली असून बुधवारी संध्याकाळपासून सुरू झालेले पाणी बंद शनिवारी सकाळपर्यंत कायम राहात आहे. एमआयडीसी भागात शुक्रवारी सर्वसाधारण सुट्टी असल्याने कारखाने ही पाणीटंचाई सहन करीत आहेत, पण २४ तास पाण्याची सवय लागलेल्या नागरी वसाहतीचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नागरिकांना पाणी २२ टक्क्य़ांपेक्षा जास्त मिळू नये यासाठी पाण्याच्या व्हॉल्ववर एमआयडीसीने टाळे लावले आहे. या झोपडपट्टी भागातून २२ नगरसेवक निवडून आले असून नुकत्याच झालेल्या एमआयडीसीच्या सर्वेक्षणातून ५२ हजार झोपडय़ा आढळून आलेल्या आहेत. यात बेकायदेशीर झोपडय़ा गृहीत धरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लोकसंख्या अडीच लाखांच्या वर जात आहे. त्यांना दैनंदिन लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची मोठी आबाळ झाली आहे. साठ तास पाणी बंद असल्याने पाणी साठवण्यासाठी प्रत्येक झोपडीसमोर एक पिंप भरून ठेवला जात आहे. ते पाणी रात्रीच्या वेळी चोरी होत असून त्यावर जागता पहारा ठेवला जात असून त्या पिंपाला टाळे ठोकले जात आहे. अद्याप कडक उन्हाळा सुरू झालेला नसताना येथील महिलांनी नगरसेवकांना प्रभागात फिरणे मुश्कील केले आहे. त्यांना एमआयडीसीचे पाणी, पाणीकपात, पालिकेची नसलेली जोडणी ही कारणे सांगून चालत नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले. एमआयडीसीने पाणीकपात केल्यानंतर पालिका या भागात सहा ते सात टँकर पाठवीत होती, पण ती संख्यादेखील कमी झाली असून आता एक-दोन टँकरवर रहिवाशांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांची व्होट बँक असलेल्या झोपडपट्टी भागात पाणीटंचाईवरून कोणत्याही क्षणी आणीबाणी उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालिकेने पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन न केल्याने ही वेळ आली आहे. दोन वर्षांपूर्वी बारवीचे पाणी मिरा-भाईंदर भागाला देण्यात आल्यानंतर आमच्या पाणीपुरवठय़ावर आज ना उद्या कात्री लावली जाणार हे माहीत होते. त्यामुळे पालिकेने पाण्याचे नियोजन करावे यासाठी मी आग्रह धरत होतो, पण पालिकेने वेळीच लक्ष दिले नाही. आता बारवीचे सर्व पाणी बंद करण्याचा विचार केला जात आहे. पालिका या भागातून विविध कर घेत असल्याने त्यांनीच पाण्याचे नियोजन करावे, असे एमआयडीसीचे मत आहे. तहान लागल्यावर विहीर खोदून काय उपयोग? झोपडपट्टी भागातील अडीच लाख जनतेच्या सहनशीलतेचा अंत होण्याची वेळ आता आली आहे. पाणीटंचाईची भीषणता जशी जाणवेल तसा उद्रेक होणार आहे.

बहाद्दरूसिंह बिष्ठ, शिवसेना नगरसेवक, इलटणपाडा, दिघा इलटणपाडा भागात रेल्वेने दीडशे वर्षांपूर्वी बांधलेले एक धरण आहे. पारसिक डोंगराच्या कपारीतून येणारे पाणी अडवून कळवा येथील कारशेडसाठी हे धरण बांधण्यात आले होते. पालिकेने तसेच माजी खासदार संजीव नाईक व आमदार संदीप नाईक यांनी अनेक वेळा रेल्वेकडे मागणी करूनही हे धरण पालिकेला दिले जात नाही. धरणातील पाण्यावर इलटणपाडा, दिघा भागातील जनता आंघोळ, कपडे धुणे आटपत आहे. त्यामुळे पाणीटंचाईला हे धरण आधार झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: People are locking water drum to save water water problem in navi mumbai