पानवाल्याकडून चिरीमिरी घेणे अंगाशी
गुटख्याचा साठा पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी संबंधित पानटपरीवाल्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या रहिवाशांनी या पोलिसांवर दगडफेक करण्याची घटना गेल्या आठवडय़ात कामोठे वसाहतीत घडली. गेल्या आठवडय़ातील या प्रकाराला वाचा फुटू नये यासाठी स्थानिक पोलिसांपासून आयुक्तालयातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी खबरदारी घेतल्याचे उघड झाले. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलाच्या नामुष्कीत भर पडली आहे.
कामोठे वसाहतीमधील सेक्टर १४ येथील पानाच्या गादीवर गुटखा विक्री होत असल्याची माहिती नवी मुंबईच्या समाजसेवा विभागातील काही अधिकाऱ्यांना मिळाली. हे पोलीस कामोठे येथील सेक्टर १४ येथे आले. त्यांनी या गादीमालकाला काही गुटख्याच्या पुडय़ांसह पकडले. त्यानंतर हे पोलीस त्याला घेऊन बेलापूरच्या दिशेने गेले. पोलिसांचे वाहन कोपरा गावापर्यंत गेल्यावर या तरुण पानवाल्याशी पोलिसांनी ‘तडजोड’ केली. यानंतर या चिरीमिरीची रक्कम घेण्यासाठी समाजसेवा विभागाचे पोलीस कामोठे येथे आले. मात्र या तरुणाच्या मित्राने याबाबत कामोठे पोलिसांना माहिती दिली. कामोठे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे साहायक पोलीस निरीक्षक भोईर हे दोन वाहनांसह घटनास्थळी आले. भोईरांच्या ताफ्यातील वाहने पाहून समाजसेवा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे असल्याचा संशय आला. त्यामुळे पानवाल्याकडून चिरीमिरीची रक्कम घेण्याऐवजी त्यांनी तेथून धूम ठोकली. यावर या पानवाल्याने पळणाऱ्या पोलिसांकडे पाहून ‘चोर चोर’ म्हणून ओरडणे सुरू केले. या रस्त्यावर गर्दी असल्याने अनेक जणांनी हातात मिळेल ते उचलून या पोलिसांचा पाठलाग केला. या वेळी या पोलिसांना दगडांचा प्रसादही खावा लागला. त्यांनी कसेबसे कामोठे पोलीस ठाणे गाठले. याबाबत समाजसेवा विभाग व कामोठे पोलिसांशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा त्यांनी केला. जमाव जमला असल्याचे कळल्यामुळे पोलीस घटनास्थळी गेले होते मात्र पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
वर्दी नसल्याने लाज गेली
नवी मुंबईतील स्पा, हुक्का पार्लर, सीडी पायरसी, अश्लील चित्रफिती, लेडीज बार, पत्त्यांचा क्लब आदींवर कारवाई करण्यासाठी समाजसेवा विभागाची स्थापना करण्यात आली. आयुक्तालयात या विभागाला स्वतंत्र कक्ष देण्यात आले. पूर्वीचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी सर्व विभागांतील पोलिसांना गणवेशात काम करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे समाजसेवा, गोपनीय व विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांच्या अंगावर वर्दी दिसत होती. सोमवारच्या घटनेत समाजसेवा शाखेतील पोलिसांच्या अंगावर वर्दी नसल्याने त्यांना पलायन करणे भाग पडले.