एपीएमसी, सेक्टर १९ मधील ओमकार ऑटो गॅरेजजवळ तीन व्यक्ती चार चाकी वाहन घेऊन उभ्या होत्या. या वेळी रात्रीच्या वेळेला गस्त घालत असताना पोलिसांना यांच्यावर संशय आल्याने त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अबीद ऊर्फ सलमान खान, ओमप्रकाश उपाध्याय अशी आहेत.
पकडलेल्या आरोपींची चौकशी केली असता गाडी चोरण्यासाठीच आल्याची कबुली त्यांनी दिली असून मुंबईमधून वेरणा कारसुद्धा चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. या आरोपींकडून अधिक चौकशी केली असता जावेद ऊर्फ बबलू मखत्यार खान व अल्ताफ इक्बाल अली याला भिवंडी येथून राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून आतापर्यंत तीन चार चाकी वाहने व नऊ मोबाइल, ६७ बनावट चाव्या, पकड, कानस, इत्यादी वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर आरोपींना गुरुवापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.