पनवेल व उरण तालुक्यातील पोलिसांसाठी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता दिवाळी मेळावा हा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कौटुंबिक मेळाव्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, रुचकर भोजनाचा आस्वाद पोलीस आपल्या कुटुंबासोबत घेणार आहेत. पनवेल शहरामधील पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) यांच्या कार्यालयासमोरील मैदानात हा सोहळा आयोजित केला आहे. तब्बल एक हजार पोलीस व त्यांचे कुटुंबीय या मेळाव्यात सामील होणार आहेत.
पनवेल तालुक्यामध्ये असणाऱ्या तळोजा, कळंबोली, खारघर, कामोठे, खांदेश्वर, नवीन पनवेल आणि पनवेल शहर या पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वीही दिवाळी पहाट हा कार्यक्रम पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी घेतला जात होता.
मात्र पोलीस आयुक्त बदलले की प्रथा बदलतात त्याप्रमाणे ही चांगली प्रथा बंद झाली. पोलीस आयुक्त रंजन यांच्यासमवेत पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे व साहाय्यक आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या सकारात्मक पवित्र्यामुळे ही प्रथा पुन्हा एकदा सुरू झाल्याने पोलिसांनी समाधान व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई येथील मराठी व हिंदी सदाबहार गीते येथे ऐकायला मिळणार आहेत. तर कार्यक्रमात स्वत: पोलीस आयुक्त रंजन यांच्यासोबत पोलीस कर्मचारी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेणार आहेत.