नवी मुंबई : आरक्षणासाठी राज्यात सर्वत्र बुधवारी बंदची हाक दिली गेलेली असताना नवी मुंबईत मात्र या बंदच्या निमित्ताने राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार घडला. कोपरखैरणे येथे दोन गटांत तेढ निर्माण होऊन वातावरणात तणाव पसरला होता. परिस्थिती अधिक चिघळू नये, यासाठी कोपरखैरणेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात दोन दिवस अघोषित संचारबंदी होती. सकल मराठा मोर्चाने बुधवारी बंद पुकारला. बुधवारी रात्री शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख जाहीर झाल्याने सेनेतील असंतोष या बंदच्या निमित्ताने उफाळून आला. याच काळात शिवसेनेचे कोपरखैरणे येथील नगरसेवक शिवराम पाटील यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला.

नवी मुंबईतील सकल मराठा मोर्चाचे समन्वयक म्हणून आमदार नरेंद्र पाटील काम पाहात आहेत. दुपापर्यंत शांततेत चाललेले आंदोलन नंतर आक्रमक झाले. त्यामुळे जाळपोळ, दगफेक, दमदाटी असे प्रकार ठिकठिकाणी सुरू झाले. पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत पण ते अलीकडे भाजपच्या संपर्कात असून त्यांच्या माथाडी संघटनेत या भूमिकेवरून दोन गट पडलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक साध्य केलेले पाटील काही दिवसांतच भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा समाजाचे हे आंदोलन शांततेत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण मुख्यमंत्र्यावर शेकणारे हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न नवी मुंबईत झाला. असे केल्याने पाटील यांची प्रतिमा मलीन होऊन मुख्यमंत्री त्यांच्यावर नाराज होतील अशी व्यवस्था या आंदोलनाच्या निमित्ताने केली जात होती. या राजकीय डावपेचात काही मंडळी यशस्वी झाल्याचे बुधवारच्या घटनेवरून स्पष्ट दिसून आले. हे आंदोलन वेगळे रूप धारण करीत असल्याचे दिसतानाच पाटील यांनी या आंदोलनात समाजकंटक घुसल्याचे जाहीर केले. नरेंद्र पाटील यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांचे पंख कापण्याचे प्रयत्न या आंदोलनात झाल्यानंतर संध्याकाळी कोपरखैरणे येथे वातावरण अचानक तंग झाले. दहा वर्षांपूर्वी कोपरखैरणे व घणसोली या दोन भागांतील माथाडी विरुद्ध आगरी अशी दंगल होऊन दोन जणांचा बळी गेला होता. रंगपंचमीत लावलेल्या तथाकथित रंगावरून ही दंगल झाली आणि तीन दिवस नवी मुंबई जळत होती. या दंगलीत आगरी आणि माथाडी जे जास्तीत जास्त मराठा आहेत त्यांच्यात एक दरी निर्माण झाली. बुधवारच्या मराठा बंदच्या निमित्ताने ही ताकद दाखवण्याचा प्रयत्नात एका जमावाने येथील शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांच्या कार्यालयाची मोडतोड केली. त्याचा बदला घेण्यासाठी गावातील आगरी समाजाने सहा तरुणांना रात्री बेदम मारहाण केली. हे प्रकरण चांगलेच पेटणार होते पण पोलिसांनी ते वेळीच आटोक्यात आणले. याच वेळेस शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नवी मुंबईचे दोन पक्ष पातळीवर दोन जिल्हे करून उत्तर व दक्षिण नवी मुंबईसाठी दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली. यात पालिकेचे विरोधी पक्षनेते व माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांना तर डावलण्यात आले पण त्यांच्या समर्थकालाही संधी देण्यात आली नाही. हा संतापही शिवसेनेत धुमसत आहे. उत्तर जिल्हाप्रमुख म्हणून द्वारकानाथ भोईर आणि दक्षिण जिल्हाप्रमुख म्हणून विठ्ठल मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेने यात मराठा आणि आगरी तसेच शहरी आणि ग्रामीण असा समतोल साधला आहे. पाटील यांच्या कार्यालयावरील हल्ल्यात या असंतोषाची बिजे पेरली गेली आहेत. त्यामुळे राज्यात आरक्षणावरून रणकंदन माजले असताना नवी मुंबईत मात्र राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला गेला आहे.