‘सायकल चालवा निरोगी राहा’, ‘निसर्गाचे संवर्धन करा’ आदी संदेश देत उरणमधील ५२ वर्षीय प्रकाश केणी सायकलवरून प्रवास करीत जनजागरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी उरण ते कन्याकुमारी असा १८०० किलोमीटरचा प्रवास करण्याचा संकल्प त्यांनी सोडला असून रविवार या परिक्रमेची सुरुवात झाली. उरण शहरातील शुद्धता माता चर्चपासून सुरू झालेल्या या प्रवासाला उरणमधील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
जेएनपीटी सीमाशुल्क विभागात कार्यरत असलेले प्रकाश केणी हे नियमित व्यायाम व सायकल चालवण्याचे पुरस्कर्ते आहेत. या दोन गोष्टींशिवाय पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी त्यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. पाणी वाचवा, पृथ्वी आणि जग वाचवा, असा संदेश देत केणी यांनी रविवारपासून सायकल प्रवासाला सुरुवात केली. यापूर्वी त्यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीत उरण ते राजस्थान हा ९०० किलोमीटरचा तर, गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये उरण ते चेन्नई हा १३६० किलोमीटरचा प्रवास केला आहे.