कामोठे परिसरात रिक्षाचालकांची मनमानी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभाग फेरी – प्रभाग क्र. १३

रस्ते आहेत, पण बस, रिक्षा अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच नाही, शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र, उद्याने, मैदाने, सार्वजनिक शौचालये नाहीत.. पनवेल महापालिकेचा प्रभाग क्रमांक १३ अशा अनेक अभावांना तोंड देत आहेत. या प्रभाग क्षेत्रात इमारती तर वाढल्या आहेतच, मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा नगण्य आहेत. त्यामुळे परिसरात नागरी सुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.

कामोठे शहरात रास्ते बांधण्यात आले, मात्र त्या रस्त्यांवरून एकही बस धावत नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात ग्रामपंचायत व सिडको अपयशी ठरली आहे. बहुतेक रहिवाशांना कामोठे व कळंबोली गाठण्यासाठी मानसरोवर रेल्वे स्थानकातून रिक्षाने प्रवास करावा लागतो. काही मोजक्या बस आहेत, मात्र त्या कामोठे शहरातील मुख्य रस्त्यावरूनच धावतात. शहराच्या आतील भागातील प्रत्येक विभागात बस पोहोचत नाही. याचाच फायदा रिक्षाचालकांनी घेतला आहे. ते मनमानी भाडे आकारून प्रवाशांना वेठीस धरतात. जे अंतर कापण्यासाठी मीटरनुसार २० रुपये आकारले जातील, तेवढय़ाच अंतरासाठी ४० रुपये उकळण्यात येतात. परिणामी कामोठय़ातील रहिवाशांना मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा ते एक किमी पायपीट करून घरी पोहोचावे लागते.

इतर प्रभागांच्या तुलनेत या प्रभागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. प्रभाग ११ पासून पाण्याचा पुरवठा सुरू होतो. ११ आणि १२ प्रभागांनंतर ते पाणी प्रभाग १३मध्ये पोहोचते. त्यामुळे येथील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठय़ाची समस्या नेहमीच भेडसावते. दिवसभरात केवळ अर्धा तास ते सुद्धा कमी दाबाने पाणी  येते. या मोठय़ा समस्येवर पनवेल पालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. प्रभागात शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र, विरंगुळा केंद्र उभारावे, शहरात मानसरोवर रेल्वे स्थानकातील एकमेव शौचालय वगळता एकही सार्वजनिक शौचालय नाही, त्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

उद्यानांच्या विकासाची मागणी

प्रभाग १३मध्ये नागरिकांसाठी एकही उद्यान किंवा मैदानात नाही. से ११ येथे दोन वर्षांपूर्वी उद्यान विकसित केली होती. मात्र ते काम अर्धवट सोडण्यात आले. दोन वर्षांपासून काम अर्धवट राहिल्याने आधीचे कामही पाण्यात गेले आहे. उद्यानालगतच वीटभट्टी असल्याने रहिवाशांना प्रदूषणाचा त्रास सोसावा लागतो आहे. या प्रभागात पालिकेने उद्यानाचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.

प्रभाग क्षेत्र 

कामोठे से.७, १७,१८, ३१ ते ४२ व से. ४४ ते ४८ जुई गाव

लोकसंख्या  २४९८९

एकूण मतदार  २०३४३

स्त्री मतदार    ९५१५

पुरुष मतदार १०८२४

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem in ward no 13 of panvel municipal corporation
First published on: 09-05-2017 at 02:33 IST