ऐरोली व कोपरखैरणेतील प्रकल्प पूर्णत्वास; १८ रुपये ५० पैसे प्रति क्युबिक लिटर दराने विक्री
विकास महाडिक
नवी मुंबई : नवी मुंबई पालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून तो विकण्याचा प्रयत्न पालिकेने दहा वर्षांपूर्वी केला असून आता ऐरोली व कोपरखैरणे येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात अनुक्रमे ४२ व ४९ दशलक्ष लिटर पाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून हे पाणी येत्या आठ दिवसांत महापे येथील लघु व मध्यम उद्योजकांना विकले जाणार आहे.
एमआयडीसी क्षेत्राला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो, मात्र काही उद्योजकांना हे पाणी पालिका देणार असून त्यासाठी ८० किलोमीटर लांबीची जलवाहिनीदेखील टाकली जात आहे. पालिकेच्या पाण्याचा हा दर १८ रुपये ५० पैसे प्रति क्युबिक लिटर आहे.
नवी मुंबई पालिकेने दहा वर्षांपूर्वी नेरुळ येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी नेरुळ अनिवासी भारतीय संकुलाच्या उद्यानाला व बेलापूर, नेरुळमधील काही पालिकेच्या सार्वजनिक उद्यान व मैदानांना या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य होईल, असा दावा पालिकेने हा प्रकल्प उभारताना पहिल्यांदा केला होता. मात्र हे पाणी पिण्यासाठी विकत घेण्याचे कोणी धारिष्टय़ दाखविले नाही आणि पालिकेनेही तसा प्रयत्न केला नाही. त्यामुळे नेरुळमध्ये प्रक्रिया केलेले पाणी काही प्रमाणात उद्यानांना पुरवठा केल्यानंतर ते ठाणे खाडीत सोडले जात आहे.
सांडपाण्याचे जास्तीत जास्त पुनर्वापर करण्याचे आदेश केंद्र सरकारचे आहेत. त्यामुळे ऐरोली व कोपरखैरणे येथे पालिकेने चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत हा अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारली असून कोपरखैरणे येथील ८७ दशलक्ष सांडपाण्यापैकी ४२ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र आता पूर्णपणे बांधून तयार आहे. या केंद्रातून समोरच्या औद्योगिक वसाहतीतील पहिल्यांदा सहा कारखानदारांना या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. या उद्योजकांनी हे पाणी विकत घ्यावे, अशा सूचना एमआयडीसीने यापूर्वीच दिलेल्या आहेत. पालिकेचे माजी पालिका आयुक्त एन. रामास्वामी यांच्या काळात सुरू झालेला हा प्रकल्प विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर यांच्या काळात कार्यान्वित होत आहे. आठ दिवसांत कोपरखैरणे येथील प्रक्रियायुक्त पाणी कारखानदारांना मिळाल्यानंतर एक महिन्यानंतर रबाले येथील सांडपाणी प्रक्रियायुक्त पाणी केंद्र सुरू होणार आहे. यासाठी गुरुत्वाकर्षणाने या कारखान्यांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी तुर्भे, रबाले, महापे या ठिकाणी उच्चस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत. या प्रकल्पावर १५१ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा पहिला प्रकल्प पालिकेने फार पूर्वीच उभारलेला आहे. त्यानंतर विशेष उद्योजकांसाठी कोपरखैरणे व ऐरोली येथे दोन प्रकल्प उभारण्यात आले असून या पाण्यासाठी सर्वात अगोदर ग्राहक शोधण्यात आलेले आहेत. त्यामुळे येत्या काळात लवकरच सुरू होणाऱ्या कोपरखैरणे प्रकल्पातून महापे एमआयडीसीतील कारखानदार निश्चित झाले आहेत. त्यांना पाणीपुरवठा केला जाणार असून महिनाभरात रबाले येथील प्रकल्पदेखील कार्यान्वित केला जाणार आहे. – संजय देसाई,, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2022 रोजी प्रकाशित
महापेतील सहा उद्योगांना आठ दिवसांत प्रक्रियायुक्त सांडपाणी
नवी मुंबई पालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून तो विकण्याचा प्रयत्न पालिकेने दहा वर्षांपूर्वी केला असून आता ऐरोली व कोपरखैरणे येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात अनुक्रमे ४२ व ४९ दशलक्ष लिटर पाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून हे पाणी येत्या आठ दिवसांत महापे येथील लघु व मध्यम उद्योजकांना विकले जाणार आहे.
Written by विकास महाडिक

First published on: 14-04-2022 at 00:08 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Processed wastewater days industries mahape project completion airoli koparkhairane selling liter amy