scorecardresearch

एप्रिल महिन्यापासून मालमत्ताकराची दंडवसुली सुरू

गेल्या दीड वर्षांपासून प्रयत्न करूनही पनवेल पालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमधील मालमत्ता धारकांपैकी अवघे १० टक्के नागरिकांनी मालमत्ता कर जमा केला असल्याने पालिका प्रशासनाने दरमहा २ टक्के दराने करवसुलीला सुरुवात करण्याचे मंगळवारी जाहीर केले.

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची घोषणा

पनवेल : गेल्या दीड वर्षांपासून प्रयत्न करूनही पनवेल पालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमधील मालमत्ता धारकांपैकी अवघे १० टक्के नागरिकांनी मालमत्ता कर जमा केला असल्याने पालिका प्रशासनाने दरमहा २ टक्के दराने करवसुलीला सुरुवात करण्याचे मंगळवारी जाहीर केले. पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरता यावा तसेच ऑनलाइन कर जमा केल्यावर त्याची पावती तातडीने नागरिकांना मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी पीएमसी टॅक्स नावाने अ‍ॅप सुरू केले आहे. याच अ‍ॅपच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पालिकेच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त देशमुख हे माहिती देत होते.

पनवेल पालिका क्षेत्रात नागरिकांना विकास हवा असल्यास नागरिकांनी कर भरण्याच्या प्रक्रियेला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत   पालिका प्रशासनाकडून मांडले जात आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या काळात भरावा लागणाऱ्या कराच्या रकमेत तब्बल तीन पटीने वाढ झाल्याने मोठय़ा प्रमाणात कर भरण्याला विरोध होत आहे. पालिकेने तयार केलेले अ‍ॅप  ढटउ ळअ या नावाने असून हे अ‍ॅप प्लेस्टोरमधून मोबाइल वापरकर्ते डाऊनलोड करू शकतील. तसेच मोबाइलवरून मालमत्ताधारकांच्या नावातील किरकोळ बदल असल्यास त्यासाठीही अर्ज करू शकतील. मालमत्ता कर भरणे सहज सोपे होण्यासाठी पालिकेचे हे प्रयत्न आहेत. पाच टक्के सवलतीचा कालावधी अजून एक महिना (३१ मार्च) सुरू असल्याने नागरिकांनी त्यांचा कर भरून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेचे उपायुक्त गणेश शेट्टे यांनी केले आहे. यापूर्वी पालिकेच्या वेबसाइटवरून थेट मालमत्ता कराचा भरणा करता येत होता. मात्र ही सेवा आता अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाइलधारक मालमत्ताधारकांसाठी मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. 

घरबसल्या कर भरणा करण्यासाठी पालिकेच्या अ‍ॅपचे लोकार्पण

मंगळवारी आयुक्त देशमुख यांनी संबंधित अ‍ॅपची कळ दाबून या अ‍ॅपचे लोकार्पण केले. सत्तर हजार रुपये खर्च करून स्थापत्य कंपनीने हे अ‍ॅप तयार केले असून या कंपनीचे व्यवस्थापक डोईफोडे यांनी या अ‍ॅपचे हॅकिंग कोणीही करू शकत नसल्याचा दावा केला आहे. सर्व कायदेशीर बाबी तपासूनच हे अ‍ॅप सर्वासाठी खुले केले आहे. मात्र पनवेल पालिकेमधील मालमत्ताधारकच या अ‍ॅपमध्ये त्यांच्या मालमत्तेची पडताळणी करू शकतील अशी काळजी घेण्यात आली आहे. जो मोबाइल क्रमांक मालमत्ताधारकाने नोंदणी केलेला आहे त्याच मोबाइल क्रमांकाची पुन्हा या अ‍ॅपवर नोंदणी करून त्याचा नवा पासवर्ड तयार करावा लागणार आहे. तसेच ज्या मालमत्ताधारकांनी स्वत:चा कर जमा केला आहे. त्यांनाच नावातील किरकोळ बदल व इतर सेवा मिळू शकणार आहेत. संबंधित अ‍ॅपच्या लोकार्पण सोहळय़ात सत्ताधारी व विरोधी पक्षातील कोणतेही पालिका सदस्य उपस्थित दिसले नव्हते. प्रशासनाने हा सोहळा एकटय़ानेच पार पाडला. मालमत्ता करावर सध्या पनवेल पालिकेचे राजकीय वातावरण तापल्याने कर या वादग्रस्त मुद्दय़ापासून सत्ताधारी अलिप्त राहिल्याचे पाहायला मिळाले. 

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Property tax fines start april announcement panvel municipal commissioner ysh

ताज्या बातम्या