नवी मुंबई : शहरात राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करणारी पथके गायब असल्याने शहरात अनेक ठिकाणी राडारोडय़ाचे ढीग साचले आहेत. पामबीच मार्गासह सीवूड्स रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार मोठया प्रमाणात असून शहरात मोठा पाऊस झाल्यास यामुळे पाणी तुंबण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

फ्लेमिंगो सिटीची नवी ओळख ठरू पाहणाऱ्या शहरातील पाणथळ जागा खासगी विकासकांच्या घशात घातल्या जात असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत असताना शहरातील राडारोडा उचलला जात नसल्याचे चित्र आहे.नवी मुंबई महापालिकेची राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक विभागात डेब्रिज विरोधी भरारी पथके आहेत. मात्र त्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही. पामबीच मार्गालगत खाडी किनारी वापरात नसलेले बांधकाम साहित्य टाकले जात आहे. सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पूर्वेलाही राडारोडाचे ढिगारे वाढतच आहेत.

पामबीच मार्गालगत वाशी खाडी परिसरात, सानपाडा मोराज सर्कलच्या सिग्नलपासून बेलापूपर्यंत नेरुळ, सीवूड्स, करावे परिसरात हा राडारोडा टाकला जात आहे. हा प्रकार सर्रास सुरू असताना प्रशासनाला दिसत नसल्याची खंतही नवी मुंबईकर व्यक्त करीत आहेत. याबाबत बेलापूर विभाग सहा.आयुक्त संचेती मिताली यांना विचारले असता बेलापूर विभागात टाकल्या जाणाऱ्या बेकायदा राडारोडाबाबत पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.

नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी राडारोडा टाकला जातो. यावरून शहरात बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. यावर कारवाई होणे गरजेचे आहे. – सुनील चव्हाण, नागरिक