महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केलेली लाखोंची उधळपट्टी पाण्यात
तलाव व्हिजन अंतर्गत शहरातील अनेक तलावांचा कायापालट झाला आहे. मात्र रबाले, गोठिवली येथील स्वर्गीय राजीव गांधी तलाव त्याला अपवाद आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक बाळकष्ण पाटील यांनी मोठा गवगवा करत तत्कालीन महापौर सागर नाईक यांच्या हस्ते या तलावाच्या कायापालटाचा आरंभ केला. मात्र निवडणुकीतील अपयशांनतर दीड वर्षे होऊनदेखील या तलावाचा मेक ओव्हर झालेला नाही. तलावावर शेवाळे साचले असून जॉगिंग ट्रॅकला खड्डे पडले आहेत. आसने मोडली असून तर तलावाचा धोबीघाट झाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील तत्कालीन नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी लाखो रुपयांचा नगरसेवक निधी खर्चून रबाळे येथील तलावाचे सुशोभीकरण सुरू केले. तत्कालीन महापौर सागर नाईक, आमदार संदीप नाईक यांनी बॅनरबाजी करत निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामांचा आरंभ केला. खडक फोडून जॉगिंग ट्रॅक साकारण्यात आला. काम होण्याआधीच श्रेयासाठी तत्कालीन नगरसेवक आणि महापौरांनी उद्घाटन केले. मात्र त्यांनतर नवी मुंबई महापालिकेने आणि पराभूत झालेल्या पाटील यांनी या तलावाकडे पाठ फिरवली.
आता राजीव गांधी तलावाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तलवाचा धोबीघाट झाला आहे. गाळ काढण्यात न आल्याने गवत साचून तलाव हिरवेगार झाले आहे. तर तलावावर महिला कपडे धुतात. त्यामुळे पाण्याला दरुगधी येत आहे. सुरक्षा जाळ्यावर गोधडय़ा आणि कपडे वाळवले जातात. इथे अवघे चार बाक होते. त्यातील दोन बाक मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले आहेत. रोषणाईही बंद पडली आहे. सुरक्षारक्षक नसल्याने अनेक शाळकरी मुले यात पोहण्यासाठी येतात. अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
शहरासाठी भूषणावह असणारा एखादा प्रकल्प जर राजकीय आणि महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे रखडला तर नागरिकांनी काय अपेक्षा धरायची असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक राजाराम मढवी यांनी उपस्थित केला. याबाबत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे कधी जाब विचारणार असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. तलावाचा कायापालट करण्यासाठी आणि सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचे विद्यमान नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी सांगितले. १७ ऑक्टोबरला शहर अभियंता मोहन डगावकर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. त्यांनतर सर्वसाधारण सभेतदेखील हा विषय घेण्यात आला. मात्र अद्यापही त्यावर कारवाई झालेली नाही.
बारसे झाले, बाळसे नाही
नवी मुंबई महानगरपालिकेने रबाले गोठिवलीतील या तलावाचे ६ फेब्रुवारी २०१० रोजी भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी तलाव असे नामकरण केले. त्यांनतर २०११ मध्ये तलाव व्हिजन अंतर्गत या तलावाला जोधपुरी प्रवेशद्वार उभारण्यात आले. २०१३मध्ये तलावाची साफसफाई करण्यात आली. फेब्रुवारी २०१५ मध्ये पालिका निवडणुकीच्या तोंडावर केवळ पदपथ उभारण्यात आला. त्यामुळे एवढा खटाटोप करूनही ६ वर्षांत तलावाची दुरवस्थाच झाली आहे.