पनवेल शहराची तहान भागविण्यासाठी हक्काचे धरण असूनही पाण्याच्या तुटवडय़ामुळे एप्रिल व मे महिन्यांपर्यंत पाणीटंचाईची वाट न पाहता पनवेल नगर परिषदेने सामान्यांना पाण्याची स्थिती व नियोजनाचा आराखडा समजण्यासाठी पाणी परिषद भरविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
पनवेल शहराला २६.५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. सध्या पनवेलकरांची ही गरज देहरंग धरणातील पाणीसाठा भागवते. मात्र येथील अपुऱ्या साठय़ामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, औद्योगिक विकास महामंडळ आणि सिडको प्रशासनाकडून उसने घेऊन पनवेलकरांची तहान भागविण्याची कसरत नगर परिषदेकडून होत आहे. सामान्य पनवेलकरांना पाण्याची आजची स्थिती समजावी म्हणून पाणी परिषद घेण्याची मागणी या अगोदरही नगरसेवक कांबळे यांनी नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत केली आहे. नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश चितळे यांना याबाबत लेखी पत्र नगरसेवक कांबळे यांनी दिले आहे. या पत्राचा आठ दिवसांत सकारात्मक विचार न केल्यास शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्ते तसेच जिल्हास्तरीय नेत्यांना एकत्र आणून पनवेलकरांच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा नगरसेवक कांबळे यांनी दिला आहे.