ओला आणि सुका कचऱ्याचे घरातच वर्गीकरण करून तो वेगवेगळ्या कचराकुंडीत टाकण्याच्या सक्तीला नवी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कचऱ्याच्या वर्गीकरणात हयगय केली जाणार नसल्याचे सांगितल्याने रोज ६५० मेट्रिक टन कचऱ्यामध्ये २१७ मेट्रिक टन ओला कचरा आणि ४७ मेट्रिक टन सुका कचरा संकलित केला जात आहे.
ओल्या कचऱ्यामध्ये खराब फळे, भाज्या, उरलेले अन्न, अंडय़ाचे कवच, नारळ, शहाळी, हाडे अशा विघटन होणाऱ्या बाबीचा समावेश होतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टीक पिशव्या, रबर, थर्माकॉल, काचेच्या बाटल्या आणि काच, बॅटरी सेल, धातू, खिळे अशा गाष्टीचा समावेश होतो.
पालिका क्षेत्रातील सोसायटय़ा, हॉटेल, व्यापारी संस्था या सर्वानाच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून द्यावा अशा प्रकारे माहिती देऊन नोटिसा देण्यात आलेल्या आहे. ज्या सोसयटय़ा वर्गीकरण करून कचरा देत नाही, त्याचा कचरा उचलण्यात येत नाही; तर दैनंदिन साफसफाई व कचरा वाहतूक याबाबत काही समस्या असल्यास ९७६९८९४९४४ हा व्हॉटस्अप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून नागरिकांनी यावर फोटो व संदेश पाठवून तक्रार किंवा सूचना नोंदवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. पालिका क्षेत्रात दररोज ६५० मेट्रिक टन संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यामध्ये २१७ मेट्रिक टन ओला कचरा व ४७ मेट्रिक टन सुका कचरा संकलित करण्यात येत आहे. नागरिकांनी ओला-कचरा प्लास्टिक बॅगमध्ये देऊ नये व ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या मोहीमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.