उरण शहरासह तालुक्यातील नाक्या नाक्यावर सध्या तयार तांदळाच्या भाकऱ्या मिळू लागल्या आहेत. या भाकरीनेच अनेक कुटुंबांना रोजीरोटी मिळवून दिली आहे. भाकरीची स्वयंपाकघरातील जागा आता मोठमोठे हॉटेल्स, ढाबे तसेच पोळीभाजी केंद्रांप्रमाणे तांदळाच्या भाकरीची दुकानेही उघडण्यात आली आहेत. यामुळे अनेक महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे, तसेच बचत गटांनाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.
तांदळाच्या भाकऱ्या हा रायगड जिल्ह्य़ाच्या किनारपट्टीवरील महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे. अनेक ठिकाणी ज्वारी, बाजरी, मका यांच्या भाकऱ्या तयार केल्या जातात. यापैकी बहुतेक भाकऱ्या सुक्या पिठाच्या केल्या जातात. तांदळाच्या पिठाच्या भाकरीचे वैशिष्टय़ म्हणजे त्या ओल्या पिठाच्या असतात. त्यामुळे ती मऊ आणि चविष्ट असते. तांदळाची भाकरी आणि मटणाचा वा मासळीचा बेत जमून आल्यास त्याची अवीट गोडी चाखण्यासाठी खवय्यांची नेहमीच झुंबड उडते.
या भाकऱ्या लाकडाच्या चुलीवर, गॅसवरही तयार केल्या जातात. तशाच त्या लोखंडी, अॅल्युमिनिअम, नॉनस्टिकच्या तव्यातही तयार केल्या जातात. मात्र मातीच्या तव्यात (खापरीत) तयार केलीली भाकरी ही अधिक चविष्ट असते. भाकरी तयार करताना प्रथम थंड वा गरम पाण्यात तांदळाचे पीठ टाकून त्याचा गोळा तयार केला जातो. नंतर मोठय़ा परातीत दोन हातांच्या साहाय्याने ही भाकरी तयार केली जाते.
गेल्या ३० वर्षांपासून कॅन्टीन आहे. प्रथम लाल तांदळाची भाकरी येथे तयार केली जात होती. आता लाल तांदळाचे पीकच नसल्याने ही भाकरीही जवळपास इतिहासजमा झाल्यासारखी आहे. एका भाकरीची किंमत प्रत्येकी १० ते १२ रुपये आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबालाही आधार मिळाला आहे. दिवसाकाठी ५० ते ६० भाकऱ्या तयार करताना मेहनतीला पर्याय नाही, असे सुनीता म्हात्रे म्हणतात. कृतिका गावंड या भाकरी भाजण्यासाठी हॉटेलात मजुरी करतात. सुटीच्या दिवशी भाकरीला अधिक मागणी येत असल्याची माहिती निर्मला पाटील यांनी दिली.
भाकरी म्हणजे आईकडून मुलीला परंपरने दिलेली एक कलाच आहे.
नीराबाई पाटील, गृहिणी