नवी मुंबई : दिवसाढवळ्या दागिने हिसकावणाऱ्यास प्रतिकार केल्यावरून महिलेला गोळ्या तिची हत्या केल्याची घटना एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत उलवा येथे  घडली. हा सारा प्रकार कारमध्ये घडला गोळी झाडल्यानंतर आरोपीने पलायन केले. त्याचा एनआरआय पोलीस सध्या शोध घेत आहेत.

प्रभावती भगत (वय ५० रा. उलवा) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रभावती आणि त्यांचे पती बाळकृष्ण हे दोघे कार मधून उलवा सेक्टर-२३ येथील एका एटीएम केंद्राजवळ आले. त्यावेळी बाळकृष्ण हे एटीएम मशीनमधून पैसे आणण्यास गेले होते, मात्र जाताना त्यांनी पत्नी कारमध्येच असल्याने गाडीला कुलूप लावले नव्हते, तसेच किल्लीही गाडीतच होती. बाळकृष्ण एटीममध्ये गेल्यानंतर काही वेळातच एका व्यक्तीने कारमध्ये प्रवेश केला आणि कार दीडशे फुटांवर असलेल्या  साईबाबा मंदिर परिसरात नेऊन उभी केली. त्यानंतर प्रभावती यांच्याकडील छोटी पर्स हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात दागिने असल्याने त्यांनी पर्सचा ताबा सोडला नाही. त्यासाठी चोरटय़ाने आणखीन झटापट सुरू केली. तरीही प्रभावती यांनी दागिन्यांची पर्स न सोडल्याने  चोरटय़ाने प्रभावती यांच्या दिशेने गोळी झाडली त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर चोरटय़ाने घाबरून कार जवळच बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीनजीक सोडून पळ काढला. दरम्यान बाळकृष्ण जेव्हा एटीमच्या बाहेर आले तेव्हा त्यांची गाडी आढळून न आल्याने त्यांनी मुलास बोलावून घेतले. त्यांचा मुलगा सूरज आल्यावर शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी गाडी ज्या दिशेने गेली ते सांगितल्यावर त्या दिशेने जात गाडीची शोधाशोध सुरू करण्यात आली. तोवर भगत यांच्या परिचितांनी गाडीचा शोध घेतला. त्यात कार एटीएम केंद्रापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर सापडली. मात्र त्यात प्रभावती या जखमी अवस्थेत होत्या त्यांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल  करण्यात आले, मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या बाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख  गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी  इमारतीवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

दागिने हिसकवण्यात अपयश आल्याने हत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र हत्येच्या अन्य कारणांचाही आम्ही तपास करीत आहोत. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बाबत प्रत्यक्षदर्शी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची आम्ही छाननी करीत आहोत.

-तन्वीर शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक