बाद झालेल्या रिक्षा परवान्यांना पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मोहीम राबवली जात आहे. दंड आणि नूतनीकरणापोटी परिवहन विभागाच्या तिजोरीत एक कोटी १७ लाख रुपये जमा झाले आहेत. शिवाय शासनाने परवाने नूतनीकरणासाठीची मुदत ३० नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाच्या वतीने परवाने नूतनीकरण करण्यासाठी ३० ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र त्याला रिक्षाचालकांचा योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही मुदत १६ नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आली. या वाढलेल्या मुदतीत चांगला प्रतिसाद मिळाला. तो पाहता ही मुदत आणखीन वाढविण्यात आली आहे. ती आता ३० नोव्हेंबपर्यंत करण्यात आली आहे. आतापर्यंत वाशीतील उपप्रादेशिक परिवहन विभागात पाच हजारांच्या आसपास रिक्षा परवाने रद्द झाले आहेत. यातील ५३३ रिक्षा परवान्यांचे वेळेत नूतनीकरण न केल्याने त्यांच्या दंडाची रक्कम वाढली. त्यामुळे अनेकांनी हे परवाने नूतनीकरण करण्याचे सोडून दिले होते. काहींनी तर नव्या सोडतीमध्ये नवे परवानेही काढून घेतले. अनेकांनी नूतनीकरण केल्यामुळे वाशी कार्यालयाला एक कोटी १७ लाख ७१ हजार रुपये इतका महसूल मिळाल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.