scorecardresearch

दत्तक देण्याच्या नावाखाली मुलांची विक्री

दत्तक देण्याच्या नावाखाली लहान मुलांची विक्री करणाऱ्या तिघांच्या विरोधात नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यात दोन महिलांचा समावेश आहे.

दोन महिलांना अटक, दोन बालकांची सुटका

नवी मुंबई  : दत्तक देण्याच्या नावाखाली लहान मुलांची विक्री करणाऱ्या तिघांच्या विरोधात नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यात दोन महिलांचा समावेश आहे. तीनपैकी दोन बालकाची सुटका करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी आणि एका बालकाचा शोध सुरू आहे. यात एका मुलाचा गरोदरपणातच व्यवहार झाल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. अय्युब शेख, शारदा शेख आणि आसिफअली फारुकी अशी आरोपींची नावे असून यातील शारदा आणि असिफअली यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. तर अय्युब फरार आहे. दत्तक देण्याच्या नावाखाली लहान मुलांची विक्री होत असल्याची माहिती बदलापूर येथे राहणाऱ्या अ‍ॅड. पल्लवी जाधव यांना मिळाली होती. सदर व्यवहार नेरुळ भागात होणार असल्याने त्यांनी याबाबत नेरुळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. या माहितीची खातरजमा केल्यावर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही महिला आरोपींना ताब्यात घेतले आणि एका दोनवर्षीय बालिकेची सुटका केली. प्राथमिक अंदाजानुसार ही मुलगी आरोपीचीच आहे.

याबाबत अ‍ॅड. जाधव यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे याच आरोपींनी यापूर्वीही स्वत:ची दोन आणि अन्य पालकांची दोन अशा मुलांची विक्री केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती नेरुळ पोलिसांनी दिली. यातील अय्युब याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच विक्री केलेल्या दोन बालकांची सुटका करण्यात आली आहे.  तिसरे बालक शोधण्यास एक पथक स्थापन करण्यात आले आहे. चार ते पाच बालकांची विक्री झाल्याचा संशय आहे.

विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त

 यातील एका महिलेवर ती गरोदर असल्यापासून आमची नजर होती. २३ डिसेंबर रोजी ती प्रसूत झाली. त्यानंतर आम्ही सर्वेक्षण करीत असताना तिने बाळाची माहिती न दिल्याने शंका आली व प्रकरण समोर आले. दत्तक दिल्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करून ही विक्री  केली जात आहे. सदर महिलेने यापूर्वी आपलीच दोन मुले विकल्याचेही तपासात समोर आले आहे.

अ‍ॅड. पल्लवी जाधव, महिला व बाल कल्याण ठाणे

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sale children name adoption ysh