साने गुरुजी बालोद्यान, दिघा
सकाळी लवकर उठून आरोग्यासाठी एक दीड तास म्हणजे चालणं हाच त्यावरील पहिला आणि स्वस्तातला उपाय. हा उपाय एकदा केला की दिवस उत्साही आणि आनंदी जातो, असे अनेक वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. आजची बैठी जीवनशैली, कार्यालयातही बऱ्याच जणांना संगणकासमोर बसूनच तासन्तास काम करणाऱ्यांना तर हा सल्ला ‘बंधनकारक’ असतो. मग अनेक जण रामप्रहरी फेरफटका मारायला जातात. दिघा येथील साने गुरुजी बालोद्यान त्यासाठी अनेकांना आदर्शवादी ठिकाण वाटत आहे. वयोवृद्ध येथे फेरफटका मारायला येतात. व्यायामातील नियमिततेमुळे आणि संवादकौशल्यामुळे अनेकांचे उद्यानाशी आणि उद्यानातील चालणाऱ्यांशी मैत्रीचे सूर जुळले आहेत..
जगण्यासाठीची घेतलेली मेहनत वेगळी आणि आरोग्यदायी जगण्यासाठी घेतलेली मेहनत वेगळी. सकाळी किंवा सायंकाळी वेळ मिळेल तसं शरीराला चालतं आणि धावतं ठेवण्याचे काम अनेक जण इमानेइतबारे करीत असतात. यात काहींची आयुष्यातील १० ते १५ वर्षे गेली आहेत.
चालणारी पावले चालत असतात. तशी पद्मासन घालून योगसाधना करतात. सकाळची काहीशी थंड, शुद्ध हवा आणि वाहतुकीचा लोंढा सुरू होण्याआधी तंदुरुस्तीसाठी बळाची उपासना केली जाते. दिघ्यातील साने गुरुजी बालोद्यान यासाठी अनेकांना आधार बनले आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी या उद्यानाचा कायापालट पालिकेने केला. कधीकाळी येथे हे स्थळ गर्दुल्ल्यांचा अड्डा होता; पण आता त्याचा वापर ‘मॉर्निग वॉक’साठी केला जात आहे. मध्यंतरी बालोद्यान म्हणून ते विकसित करण्यात आले असले तरी महिला या ठिकाणी मुलांना घेऊन जाण्यास घाबरत असत. त्यातून येथील वर्दळ हळूहळू कमी झाली आणि मग बालोद्यानाचा ताबा गर्दुल्ल्यांनी घेतला. त्यानंतर या उद्यानाची मोठी वाताहत झाली होती.
आता या उद्यानाचा इतिहास बदलला आहे. चालणाऱ्या माणसांच्या वर्दळीमुळे येथील ‘जॉगिंग ट्रॅक’ भरलेला असतो. तर बोलणाऱ्या माणसांनी येथील बाके भरलेली असतात. ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची मैत्री हाही येथील एक नवा पैलू आहे. वाचण्यात मन रमण्यासाठी आणि वाचलेलं लक्षात राहण्यासाठी काही विद्यार्थी येथील एखादा कोपरा पकडतात. एखाद्या झाडाच्या सावलीखाली असे विद्यार्थी वाचनानंदात बुडालेले असतात. उद्यानातील स्वच्छता काटेकोरपणे पाळली जाते. येथे प्रवेश केल्यानंतर ती नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. शुद्ध हवेचा स्रोत म्हणूनही बालोउद्यानाचा लळा लागलेले अनेक जण गप्पांचा फड रंगवतात. उद्यानातील वेगवेगळी फुले आहेत. यातील काही गंधहीन आहेत; मात्र त्यांच्या रंगांनी मन मोहले जाते. सुगंधी फुलांच्या रांगा आणि हिरवळ हा आकर्षणाचा येथील आणखी एक बिंदू.
सोबत गुटगुटीत श्वान आणण्याचा शौकही काहीजण येथे पूर्ण करून घेतात, अर्थात काही नागरिकांना ही गोष्ट काहीशी खटकते. कारण त्यामुळे चालणाऱ्यांना ट्रॅकमध्ये अडथळे निर्माण होतात. तर काहींना विशेष करून महिलांना कुत्र्यांची भीती वाटत असते. उद्यानात कचरा होणार नाही, याविषयी अनेक जागरूक असतात. काही जण कचरा करणाऱ्यांना दम भरतात वा त्यांना पुढे तसे न करण्याविषयी सूचना करतात.
वेळकाढूपणा करणाऱ्यांना उद्यानात मज्जाव असावा, असे काहींचे मत आहे. विशेष करून उद्यानाशेजारील रहिवासी यासाठी जास्त आग्रही आहेत. उद्यानात व्यायामाची उपकरणे (ओपन जिम) बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे. सकाळी अनेकांचे मित्रांचे गट येथे चर्चेसाठी येतात. राजकारण आणि लोककारणावर उद्यानात चर्चा रंगलेली असते. या गटातील एखादा सदस्य गैरहजर राहिल्यास काहीतरी चुकल्याची भावना अनेकांच्या चेहऱ्यावर असते.
उद्यानात पिण्याचे पाणी वा स्वच्छतागृहाची सोय करण्याची मागणी करण्यात येत आहे. उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता भासते, असे येथील एकाने सांगितले. विभाग कार्यालयातून पिण्याचे पाणी आणावे लागते. या उद्यानातील बसण्यासाठीच्या जागेवर छप्पर टाकण्यात आले आहे. येथे अशी अनेक बाके बनविण्यात आली आहेत. अर्थात त्यावर काही काळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हक्क असतो. उद्यान उघडण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत.
ऊर्जा दिवसभर पुरते
व्यायामामुळे मन प्रसन्न राहतेच, पण शिस्तबद्ध व्यायामामुळे मिळालेली ऊर्जा दिवसभर पुरते.
राकेश मोकाशी, नागरिक
पहाटेचे उठणे आरोग्यदायी
सकाळी लवकर उठायची सवय व्यायामामुळे लागते. शरीराला एक प्रकारची शिस्त लागते. योगसाधनेमुळे प्रसन्न राहते. याशिवाय काहीकाळ अभ्यासही उद्यानात होऊन जातो.
सिद्धेश सूर्यवंशी, नागरिक
आनंद योग उद्यानात अनेकांशी स्नेहसंबंध जोडल्याने त्याचाही नक्कीच आनंद मिळतो, याशिवाय योग साधनेमुळे आनंद मिळतो.
रमना शिंदे, गृहिणी
