नेरुळ येथील सेक्टर १२ येथील तेरणा महाविद्यालयाने कोणतीही पूर्व कल्पना न देता शुल्कवाढ केल्याचा आरोप शिवसेनेने करीत मंगळवारी शाळा प्रशासनावर धडक दिली. त्यांनतर शाळा व्यवस्थापनाने शुल्क वाढ नसून शाळा विविध उपक्रम राबविणार असल्याचे स्पष्ट करत पालक संघटनेच्या बैठकीत पालकांच्या सहमतीनेचे वाढ केल्याचे स्पष्ट केले.
नेरुळ सेक्टर १२ मध्ये तेरणा एज्युकेशन ट्रस्ट ची मराठी आणि इंग्रजी माध्यमांची शाळा आहे. शाळा व्यवस्थापनाने पालक संघटनेची बैठक घेऊन शाळेत विद्यार्थीसाठी गायन, वाद्यांचे वर्ग, मार्शल आर्टसारखे उपक्रम राबविण्यासाठी शुल्क आकारल्याचे स्पष्ट केले. शुल्कवाढ शाळा व्यवस्थपनेने पालक संघटेनेच्या बैठकीत घेतल्याचे सांगितले.
तर शिवसेनने मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शुल्कात इयत्तेनुसार वाढ केली असल्याचा आरोप केला. पालकांनी शिवसेनेकडे यांसदर्भात तक्रार केल्यानंतर तेरणा विद्यालयाच्या प्रशासनावर धडक देत यांसदर्भात जाब विचारला. यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, शाखाप्रमुख समीर बागवान उपस्थित होते. शिवसैनिकांनी शुल्कवाढीचा निषेध केला व वाढ मागे घेण्याची मागणी केली.