नवी मुंबई : वाशीतील महापालिका रुग्णालयात सध्या रुग्णांची संख्या वाढली आहे. करोनाकाळात सहाशेपर्यंत असलेली बाह्यरुग्णसेवा आता १२०० रुग्णांवर पोहचली आहे. त्यामुळे रुग्णसेवेवरील ताण वाढला आहे.
शहरात र्निबधमुक्ती झाल्यापासून उपचारासाठी पालिका रुग्णालयात गर्दी होत आहे. करोनामुळे नागरिकांच्या रोजगारावर झालेला परिणाम व महागाई याचा फटका यामुळे सर्वसामान्य रुग्णांना पालिका रुग्णालयांचाच आधार आहे.
वाशीतील पालिकेचे ३०० खाटांचे प्रथम संदर्भ रुग्णालय असून त्या रुग्णालयात नेहमीच रुग्णसेवेचा ताण असतो. करोनाकाळात पहिल्या लाटेत हे रुग्णालय करोना रुग्णालय होते. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची मोठी अडचण झाली होती. त्यानंतर दुसऱ्या लाटेनंतर हे रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी खुले करण्यात आले. मात्र करोना संसर्ग भीतिपोटी येथील रुग्णसंख्या घटली होती. दिवसाला बाह्यरुग्ण सेवा सहाशे रुग्णांपर्यंत कमी झाली होती. आता करोना परिस्थती नियंत्रणात आल्याने येथील रुग्णसंख्या वाढली आहे. दिवसाला १२०० रुग्णांपर्यंत नोंद होत आहे. त्यामुळे येथील रुग्णसेवेवरील ताण वाढला आहे.
खासगी रुग्णालय आवाक्याबाहेर
शहरात आरोग्यसेवा खूपच महाग झाली आहे. दररोज मोलमजुरी करून ६०० रुपये मिळतात. दुसरीकडे खासगी रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांचे शुल्क ऐकूणच डोळे पांढरे होतात. त्यामुळे पालिका रुग्णालयातच आरोग्य सेवा घेतो. किमान उपचार व गोळय़ा औषधे तरी मोफत मिळतात असे वाशी येथील मजुरी करणारे दिनेश वंजारी यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात करोनानंतर पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने आरोग्यसुविधा सुरू असून करोनाकाळात बाह्य रुग्णसेवेत ६०० रुग्णांची नोंद होत असे ती आता पुन्हा एकदा दिवसाला सरासरी ११०० ते १२०० रुग्णांवर येऊन पोहचली आहे.-डॉ.प्रशांत जवादे, प्रमुख, वाशी प्रथम संदर्भ रुग्णालय