घणसोलीतील महाविद्यालय २६ डिसेंबपर्यंत बंद

नवी मुंबई : घणसोलीतील एका महाविद्यालयात १८ विद्यार्थी करोनाबाधित आढळल्यानंतर पालिका प्रशासनाने येथील बाराशे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या करोना तपासण्या केल्या. यात सर्वांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. मात्र सर्वच शाळांनी करोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेतील शाळेतील अकारावीत शिकणारा विद्यार्थी करोनाबाधित आढळला होता. त्याचे वडील कतार येथून परतले होते. परंतू त्याच्या आई -वडिलांची करोना चाचणी नकारात्मक आली होती. मात्र त्यानंतर त्याच शिक्षण संस्थेतील १८ विद्यार्थी करोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली होती.

ही शाळा दोन सत्रांत

असल्यामुळे संपर्कातील अनेकांची चाचणी करावी लागली. संस्थेत जवळजवळ १६०० विद्यार्थी शिक्षण घेत असून संस्था २६ डिसेंबपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. पालिकेने १२०० जणांच्या करोना चाचण्या केल्या आहेत. त्यातील सर्वांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तर ज्या पहिल्या मुलाची करोना चाचणी सकारात्मक आली त्याची जिनोमा स्विकेन्स चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत.  परंतु अद्याप त्यांचा अहवाल प्राप्त झाला नाही. सर्व विद्यार्थी सुरक्षित व कोणतीही लक्षणे नसलेले असून शहरातील सर्व शाळांना करोना नियमावलीबाबत खबरदारीने काम करण्याचे निर्देश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.

शाळेतील सर्वप्रथम १ विद्यार्थी करोनाबाधित झाल्याने पालिकेने मोठय़ा प्रमाणात चाचण्या केल्या. परंतू १८ विद्यार्थ्यांनंतर कोणीही विद्यार्थी करोनाबाधित नसल्याचे समाधान आहे. पालिकेने तातडीने करोना चाचण्या केल्या. २६ डिसेंबपर्यंत शाळा बंद असून त्यानंतर पालिकेच्या निर्देशानुसार शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

-आर.बी .जाधव. मुख्याध्यापक शेतकरी शिक्षण संस्थेचे  विद्यालय घणसोली