पाणीकपातीमुळे हैराण झालेले तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक बंडाच्या पवित्र्यात आहेत. राज्य सरकारने आमच्या पाणीसमस्येकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही अन्य राज्यांत उद्योग स्थलांतरित करू असा इशारा या उद्योजकांनी दिला आहे. तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशिएशन (टीएमए) च्या सभागृहामध्ये सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागूनही मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तळोजा औद्योगिक वसाहतीत ९०० हेक्टर जमिनीवर साडेसहाशे कारखाने उभे आहेत. मात्र गुरुवारपासून औद्योगिक विकास महामंडळाने या वसाहतीमध्ये आठवडय़ातील सलग दोन दिवस पाणीकपात केली आहे. गुरुवारी व शुक्रवारी कारखान्यांना पाणी न मिळाल्यानंतर शनिवारी व रविवारी कमी दाबाने पाणी आले. त्यामुळे येथील उद्योजक हैराण झाले आहेत.
टीएमएच्या सदस्यांनी गेल्या आठवडय़ात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेतली. मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. या सदस्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचेही निष्फळ प्रयत्न केले.