घणसोली येथील साडेचार वर्षांच्या नक्ष मढवी या विद्यार्थ्यांला डस्टरने मारहाण करणाऱ्या श्रीरूपा दास या शिक्षिकेला शाळा प्रशासनाने बडतर्फ केले आहे. मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला अटक करावी, अशी मागणी च्या पालकाने केली आहे.

घणसोली सेक्टर-९ मधील कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये ज्युनियर केजीमध्ये शिकणाऱ्या घणसोली येथील नक्ष मिलिंद मढवी या साडेचार वर्षांच्या विद्यार्थाला जागा बदलली म्हणून वर्ग शिक्षिका दास यांनी हातातील डस्टरने पाठीवर व डोक्यावर मारहाण केली होती. या प्रकरणी शाळेच्या विश्वस्त हरजीत कौर यांनी त्या शिक्षिकेला कामावरून बडतर्फ केले आहे. यासंबंधीची माहिती शाळेतील शिक्षिकांनी नक्षच्या पालकांची भेट घेऊन दिली आहे. मात्र, पोलिसांकडे तक्रार करूनही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या शिक्षिकेवर बाल संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करून अटक करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे नक्षला जबर मानसिक धक्का बसल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. शुक्रवारी सकाळी शाळेतील काही वर्गमित्र आणि शेजारची मुले रुग्णालयात आल्यानंतर नक्ष थोडासा बोलू लागला आहे. मारहाणीच्या धक्क्यातून तो अजूनही पूर्णपणे सावरला नसल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.