विकास महाडिक

जलवाहिनीतून दररोज साडेतीन लाख लिटर ‘पाणीचोरी’

शहराच्या चारही बाजूने पाण्याचे विविध स्रोत उपलब्ध असलेल्या पनवेल पालिका क्षेत्रातील पाणीटंचाईच्या झळा पावसाळा संपण्यापूर्वीच बसू लागल्याने सिडको आणि पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पनवेल पालिका क्षेत्रातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाताळगंगा नदी आणि हेटवणे धरणातून येणाऱ्या जलवाहिनीतून दिवसाला साडेतीन लाख लिटर पाणी चोरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या चोरीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कोणतेही नियंत्रण नाही. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पाणीपुरवठय़ातील चोरी अथवा गळती १८ टक्यांपेक्षा जास्त असता कामा नये असा नियम आहे. ही चोरी ३० टक्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ती रोखण्याचे मोठे आव्हान एमजीपीसमोर आहे.

पनवेल पालिका क्षेत्राला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या(एमजेपी) पाताळगंगा जलशुद्धीकरण प्रकल्प, नवी मुंबई पालिकेच्या खालापूर येथील मोरबे धरण प्रकल्प, जलसिंचन विभागाच्या पेण येथील हेटवणे धरण तसेच पनवेल पालिकेच्या सर्वात जुन्या देहरंग धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. काही प्रमाणात एमआयडीसीही पाणी पुरवठय़ाचा भार उचलत आहे. खारघर, कळंबोली, तळोजा, नावडे, कामोठे, नवीन पनवेल (पूर्वे-पश्चिम) जुने पनवेल आणि २९ गावांना सुमारे २९५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाण्याच्या तुटवडय़ामुळे ही सर्व प्राधिकरणे पनवेल क्षेत्राला केवळ २०९ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सध्या करीत आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात ८६ दशलक्ष लिटर टंचाई जाणवत आहे.

पनवेलमध्ये पाताळगंगा व हेटवणे धरणापासून येणाऱ्या जलवाहिनीतून दररोज ३५ दशलक्ष लिटर अर्थात साडेतीन लाख लिटर पाण्याची चोरी होत आहे. ही चोरी ज्या गावांमधून जलवाहिनी पनवेलपर्यंत येत आहे त्या गावातील ग्रामस्थ करीत असल्याचे एमजीपीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाताळगंगा व हेटवणेमधून पनवेलला दररोज ११५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात असून पनवेलपर्यंत हे पाणी केवळ ८० दशलक्ष लिटपर्यंत पोहचत आहे. सुमारे १२० किलोमीटर अंतरावर येणाऱ्या या जलवाहिन्यातील पाण्यावर ग्रामस्थांचाही सारखाच हक्क आहे असे मान्य करण्यात आले आहे. एमजेपीने या ग्रामस्थांना एक किंवा दोन दशलक्ष लिटर पाणी घेण्याची मुभा दिलेली असताना या गावातील ग्रामस्थ व जवळच शेतघर (फार्म हाऊस) विकसित करणारे उच्चभ्रू पाण्याची चोरी करीत असून ती दिवसाला साडेतीन लाख लिटर आहे. या पाण्याचे पैसे देखील मिळत नसल्याने एमजीपीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. भविष्यात पनवेलच्या शहरी व ग्रामीण भागासाठी ४६९ दशलक्ष लिटर पाण्याची गरज लागणार असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. एमजीपीच्या न्हावा-शेवा अतिरिक्त पाणीपुरवठा टप्पा क्रमांक ३ मधील पाण्यावरही पनवेलने हक्क सांगितला आहे.

बैठकांवर बैठका

पनवेलचे आमदार आणि सिडकोचे अध्यक्ष अशा दोन्ही काटेरी खुच्र्यावर बसलेल्या प्रशांत ठाकूर यांच्यासमोर पनवेलची पाणी समस्या सोडविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे गेले दोन दिवस ते केवळ पाण्यासाठी पाणीपुरवठा प्राधिकरणांच्या अधिकाऱ्याबरोबर बैठका घेत आहेत. बुधवारी ते हेटवणे, मोरबे व पाताळगंगा या पाणी स्रोतांना भेटी देऊन पाणी गळतीची पाहणी करणार आहेत.

पनवेलमधील पाण्याची समस्या गंभीर आहे. ती सोडविण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. पाताळगंगावरून येणाऱ्या जलवाहिन्यांतून मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याची बाब एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे ही गळती रोखण्याचे संयुक्त प्रयत्न केले जाणार आहेत.

-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका.