भेकर की सांबर; खातरजमा न करताच जंगलात रवानगी
चिर्ले गाव परिसरात सोमवारी मानवी वस्तीत सांबर आढळले. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी सांबर घराभोवतीच्या कुंपणात अडकले होते. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी प्राणिमित्रांना दिल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. हरणे आणि सांबर मोरा परिसरातील डोंगरात याआधी आढळली होती. दरम्यान, वनविभागाने हे हरीण कोणत्या वन्यगटातील आहे, याची खातरजमा न करताच त्याला जंगलात सोडून दिले. त्यामुळे ते सांबर होते की भेकर याची माहिती कळू शकली नाही.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन विभागाने उरणमधील चिरनेर तसेच पनवेलमधील कर्नाळा अभयारण्य आरक्षित केले आहे. या परिसरात होणाऱ्या वन्यजीवांच्या शिकारीवरही वन विभागाचे लक्ष आहे. मात्र तरीही या परिसरातील पक्षी, प्राणी यांची शिकार होत आहे. त्यामुळे या संरक्षित जंगलातील प्राण्यांची संख्या कमी झाली आहे.असे असले तरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ लगत असलेल्या चिर्ले गावाशेजारील जंगलात आजही काही प्राण्यांचे वास्तव्य आहे.
या प्राण्यांच्या संरक्षणासाठी चिर्ले येथील निसर्ग व प्राणीप्रेमी आनंद मढवी व त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांची जंगल परिसरात भटकंती सुरू असते. सोमवारी अचानकपणे चिर्ले गावाच्या दिशेने कुत्र्यांनी हल्ला केल्याने सांबराने गावाचा रस्ता धरला. या सांबराला पाहून ग्रामस्थांनी आनंदला बोलाविले त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने त्याची सुटका केली आहे. तीन ते साडेतीन फूट लांबीचा हा सांबर आहे. त्याचे वजन अंदाजे १३ ते १४ किलो असून याची माहिती उरणच्या वन विभागाला देण्यात आली आहे. त्यामुळे तो ताब्यात घेऊन वन विभाग यासंदर्भात निर्णय घेणार आहे.