खारघरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. इमारतीत गाडी लावल्यावरुन व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनीश ठाकूर असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून रुपेश पाटील असे मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा- इमारतींच्या पुनर्विकास प्रशिक्षणास उरणकरांचा प्रतिसाद; अ‍ॅड. श्रीप्रसाद परब यांचे मार्गदर्शन

दोन्ही बाजूच्या व्यक्तींवर गुन्हे दाखल

रुपेश हे खारघर वसाहतीमधील सेक्टर १० येथील अनमोल प्लनेट या इमारतीमध्ये राहतात. ते या सोसायटीचे सचिव आहेत. याच इमारतीमध्ये मनीष यांचा स्थावर मालमत्ता आणि वाहन विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सोसायटीच्या आवारात वाहने उभी करण्यावरुन रुपेश आणि मनीष यांच्यात वाद होते. बुधवारी १४ स्पष्टेंबरला रुपेश आपल्या सहकाऱ्यांसह मनीष यांच्या ऑफिसमध्ये बोलण्यासाठी गेले. मात्र, वाद इतका वाढला की, रुपेश यांच्या ॉमनीष यांच्या कानशिलात लगावली. या घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये रुपेश मारहाणीसोबत शिविगाळ करतानाही दिसत आहे. या घटनेनंतर मनीष यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून रुपशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रुपेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनीष यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- CM शिंदेंच्या घरासमोरील महामार्गावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांनाच पत्र; म्हणाले, “नागरिक आपला…”

युवासेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश

रुपेश यापूर्वी युवासेनेचे प्रमुख अदीत्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी होते. नूकताच त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आपल्या जिवाला धोका असल्याच्या दोन तक्रारीनंतर रुपेश यांना नवी मुंबई पोलीसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. मनीष यांच्याविरोधात पोलीसांनी रुपेश यांना जबरदस्तीने अटकाव केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे. अजूनही पनवेल व उरणमध्ये शिंदे गटात पक्षप्रवेश कऱणा-यांची संख्या कमीच आहे. पनवेलच्या विविध वसाहतींमध्ये परराज्यातून नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थिरावलेल्या रहिवाशांच्या मनात शिंदे गटाची मोट बांधत असताना रुपेश व त्यांच्या सहका-यांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर परराज्यातील रहिवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत. अद्याप रुपेश यांना कोणतेही पद शिंदे गटाकडून देण्यात आलेले नाही.