मराठा समाजाच्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी केलेला राज्यव्यापी चक्का जाम नवी मुंबईत शांततेत पार पडला. या आंदोलनामुळे नवी मुंबईतील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यातच रिक्षाही बंद असल्यामुळे नागरिकांना रेल्वे, बस आणि खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागला. बस आणि रेल्वेसाठी प्रवाशांच्या भल्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात यावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

नवी मुंबईमध्ये वाशी येथील शिवाजी महाराज चौक, बेलापूर किल्ला गावठाण, वाशी टोलनाका, येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी वाशी टोल नाका, बेलापूर येथील किल्ला गावठाण, वाशी शिवाजी चौक येथे प्रत्येकी पाच मिनिटे रस्ता अडवला. आंदोलनकर्त्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे त्या काळात या परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतून कोंडी झाली होती. आमदार नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक राजू शिंदे आणि मराठा कार्यकत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चक्का जामनंतर आंदोलनकर्त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त प्रशांत खैरे यांनी दिली. रिक्षाचालकांचा देखील बंद असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर झाला. प्रवाशांनी एनएमएमटी, एसटी, बेस्टच्या बसेसचा पर्याय स्वीकारला.

हिंसक आंदोलन हवे आहे का?

आरक्षण देणे आणि कोपर्डीप्रकरणी आरोपींना फाशी देणे यासह अन्य मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. वेगवेगळ्या सबबी दिल्या जात आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर दिसत नाही, तरीही मराठा क्रांती मोर्चा मूकपणे आंदोलन करत आहे, असे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते. मोर्चानंतर आता रास्ता रोको आंदोलनही शांततेच्या मार्गाने करण्यात आले आहे. सरकारला इतर राज्यांप्रमाणे हिंसक आंदोलन हवे आहे का, असा सवाल आंदोलकांनी केला.

उरणमध्ये वाहतूक सुरळीत

जेएनपीटीतील बंदर विभागात वाहतूक सुरळीत सुरू होती. उरणमधील औद्योगिक परिसरातील व्यवहारही नेहमीप्रमाणे झाले. उरणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेएनपीटी बंदर मार्गावरील कंटेनरची वाहतूक नेहमीप्रमाणे त्याच क्षमतेने सुरू होती, अशी माहिती जेएनपीटी परिसराचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक एस. डी. शिंदे यांनी दिली. बंदमुळे अनेक वाहने रस्त्यावर न उतरल्याने औद्योगिक परिसरातील वाहनांची संख्या कमी दिसत होती. उरणमधील मराठा कार्यकर्ते नवी मुंबई तसेच पनवेलमधील आंदोलनात सहभागी झाले होते.

कामोठे  पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी

मराठा क्रांतीच्या तरुणांनी आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी पनवेल-शीव महामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर मंगळवारी सकाळी काही मिनिटे चक्काजाम केला. पोलिसांना याची पूर्वकल्पना असल्यामुळे तिथे पहाटे सहापासून बंदोबस्त लावण्यात आला होता.

मोर्चेकरी राष्ट्रीय महामार्गावर कमीत कमी वेळ थांबावेत या उद्देशाने पोलिसांनी सोमवारीच त्यांच्यासोबत बैठक घेऊन बोलणी केली होती. कायदा सुव्यवस्थेचा भंग न करता लवकरात लवकर मोर्चा आटोपण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता.  मंगळवारी सकाळी साडेआठपासून मोर्चेकरी तरुण पनवेल-शीव महामार्गावरील कामोठे येथील व्यंकट हॉटेलसमोर जमू लागले. साडेआठ ते साडेनऊ दरम्यान काही मिनिटांसाठी महामार्ग बंद करण्यात आला. साडेनऊ वाजता मोर्चाचा समारोप करत मोर्चेकरी कामोठे वसाहतीतील पोलीस ठाण्यात गेले.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे कामोठे येथे उपस्थित होते. मोर्चेकर वसाहतीमध्ये गेल्यावर मोर्चा संपला असे पोलिसांना वाटत असतानाच मोर्चातील महिला कार्यकर्त्यां व तरुण कामोठे पोलीस ठाण्यात गेले. पोलीस ठाण्याच्या आवारामधील जमाव आणि कळंबोली वसाहतीमधील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावर बसून सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली.

पोलीस त्यांना समजावण्याच्या प्रयत्नात असताना काही मोर्चेकरी मानसरोवर रेल्वेस्थानकात घुसले आणि त्यांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना पळवून लावले. यावेळी मानसरोवर रेल्वेस्थानकाच्या बाहेर नवी मुंबई पोलीस, रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलीस तैनात होते. त्यांनी जमावावर नियंत्रण ठेवले.