नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रमुख चौकांमध्ये जागोजागी वाहतूक पोलीस तैनात करत वाहन चालकांना शिस्तीचे धडे देणाऱ्या वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोपरी सिग्नल ते वाशीतील अरेंजा चौकात वाहतूक, पार्किग आणि अतिक्रमणांसंबंधीच्या नियमांची राजरोसपणे होत असलेली ऐशीतैशी का दिसत नाही असा सवाल या भागातून नियमित प्रवास करणाऱ्यांना पडू लागला आहे.

सतरा प्लाझा तसेच त्यालगत नव्याने उभी असलेली व्यावसायिक संकुले, त्यामधील बड्या हाॅटेल चालकांकडून मुख्य रस्त्यांवरच मांडली जाणारी ‘व्हॅले पार्किग’ आणि याच भागात रस्ते अडवून बिनधोकपणे आपला व्यापार विस्तारणारे वाहन दुरुस्त, सजावट करणाऱ्या दुकानदारांचा बेशिस्त कारभाराकडे वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या सर्व यंत्रणांकडून अक्षरश: डोळेझाक सुरू आहे. विशेष म्हणजे, शहराला अत्यंत कडव्या शिस्तीचे महापालिका आणि पोलीस आयुक्त लाभूनही या जेमतेम ३००-४०० मीटरच्या रस्त्यावर सुट्टीच्या दिवसांमध्ये वाढणारा कोंडीचा मनस्ताप वाढतच चालल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महेंद्र कल्याणकर यांच्याकडे ठाण्याचे जिल्हाधिकारी पद असताना त्यांनी सर्वप्रथम या विस्तारित ‘पाम बीच’ मार्गावर व्यावसायिक संकुलांसमोरील या रस्त्यांवर होणाऱ्या पार्किंगविषयी कठोर भूमिका घेतली होती. या मार्गावर उभारण्यात आलेले सतरा प्लाॅझा, पाम बीच गॅलेरिया तसेच इतर व्यावसायिक संकुलांमध्ये ये-जा करण्यासाठी एपीएमसी बाजारांलगत मागील बाजुचा प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग आहे. या संकुलांना भोगवटा प्रमाणपत्र देताना मुळात या मार्गिका स्पष्ट करण्यात आल्या आहेत, असे असताना येथील बहुसंख्य संकुलांसमोर असणाऱ्या मुख्य मार्गाच्या एका बाजूला राजरोसपणे वाहने उभी केली जातात. याच भागात गेल्या काही वर्षांत वाहन दुरुस्त आणि सजावट करणाऱ्या दुकानांच्या रांगा उभ्या राहिल्या आहेत.

आधी याठिकाणी फर्निचर माॅलची संख्या मोठी होती. या जागेचा मुळाच वापर बदलांचे नियम डावलून वापर सध्या सुरू आहे. येथील एकाही दुकानाचा प्रवेशमार्ग मुख्य रस्त्याला लागून नाही. असे असताना वाहनांच्या सजावटीसाठी आवश्यक असलेल्या या दुकानांचा व्यवसाय मात्र वाहतूक पोलीस आणि महापालिकेतील संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे तेजीत सुरू आहे. तो इतका तेजीत आहे की रस्त्याच्या दोन मार्गिका अडवून सुरू आहे. सतरा प्लाॅजा तसेच कोपरी सिग्नलला नवी मुंबई वाहतूक पोलिसांचे एक विशेष पथक नेहमीच तैनात असते. मात्र या दुकानांना लागून असलेल्या वाशीच्या दिशेने येणाऱ्या एपीएमसी सिग्नलकडे वाहतूक पोलीस तैनात नसतात. अर्थात या दुकानांना लागून मन मानेल त्या पद्धतीने वाहने उभी केली जातात त्याकडेही वाहतूक पोलीस डोळेझाक करतात. यामागील कारणांची सुरस कथा मात्र येणारे जाणारे सहज समजून जातात.

सुट्टीचा वार तर नकोसा

साधारणपणे सुट्टीचा वार अथवा आठवड्याचा शनिवार-रविवार असेल तर पाम बीच मार्गावरील सतरा प्लाझा परिसरात शहाण्यासुरत्यांनी फिरकू नये अशा बेशिस्तीचा कारभार येथे सुरू असतो. सुट्टीचा वार असल्याने आपल्या वाहनांची दुरुस्ती अथवा सजावट करण्यासाठी शेकडो वाहने या भागात येत असतात. तसेच सतरा प्लाझा आणि लगतच्या संकुलांमध्ये तळमजल्यावरील हाॅटेलांमध्येही मोठया संख्येने नागरिक कुटुंब कबिल्यासह येत असतात. ही सगळी वाहने व्हॅले पार्किगच्या नावाखाली मुख्य रस्त्यावरील दोन मार्गिका अडवून उभ्या असतात.

वाहतूक पोलीस हे सगळे पहात असतात, मात्र कानाडोळा करण्याकडे यापैकी अनेकांचा कल असतो. पुढे वाहन दुरुस्त, सजावट दुकानांचा कहर सुरू होतो. कुणीही कशाही पद्धतीने येथे वाहने उभी करतात. पोलीस दुसऱ्या बाजूकडील रस्त्यावरील यापैकी काही दुकानांमधील कामगारांसोबत गप्पा मारताना दिसतात. मात्र कोंडीत सापडलेल्या मार्गिकडे येऊन त्यावर कारवाई करण्याचे कष्ट मात्र कर्मचारी घेत नाहीत. नवी मुंबईत एरव्ही नियोजनाच्या, शिस्तीच्या गप्पा मारल्या जात असताना हा सगळा बेशीस्तीचा कारभार बिनधोकपणे कसा सुरू आहे याविषयी वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी शब्दही उच्चारताना दिसत नाहीत.

गणेश नाईक, कैलाश शिंदे, मिलींद भारंबेही हतबल?

राज्य मंत्री मंडळातील वरिष्ठ मंत्री आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या कोपरखैपणे येथील निवासस्थानी जाण्याचा प्रमुख मार्गापैकी हा एक मार्ग मानला जातो. नाईक परिवारातील सदस्य नियमित या मार्गावरून प्रवास करताना दिसतात. त्यांना या कोंडीचा सामना करावा लागत नाही का, असा सवाल येथे दररोज मानवी बेशिस्तीमुळे कोंडीत सापडणारे प्रवासी व्यक्त करत असतात. महापालिका आयुक्त डाॅ.कैलाश शिंदे आणि पोलीस आयुक्त मिलींद भारंबे हे दोन अधिकारी कडव्या शिस्तीचे तसेच सामान्यांसाठी पूरक कार्यक्रम राबविणारे म्हणून ओळखले जातात. भारंबे यांनी नवी मुंबईत अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना सतरा प्लाझा परिसरातील कोंडीचा हा खेळ त्यांना अजूनही का निस्तरता येत नाही या प्रश्नाचे उत्तर मात्र सर्वसामान्य नवी मुंबईकर शोधत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीतील सतरा प्लाझा परिसरात चारचाकी वाहनांचे सुटे भाग मिळणारी अनेक दुकाने आहेत. त्यांच्यासमोर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या गाड्यांवर आम्ही वेळोवेळी कारवाई करतो. शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येईल. – तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक पोलीस