कोपरखैरणेत महापालिकेचा प्रयोग; लक्ष ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने कचरामुक्त शहराची घोषणा करीत कचराकुंडय़ा हलविल्या. मात्र त्या ठिकाणी आजही कचरा टाकला जात आहे. अनेक उपाययोजना करूनही नागरिकांकडून बेशिस्तीचे दर्शन होत असल्याने कोपरखरणेत तीन टाकी येथे महापालिका प्रशासनाने आता एका ठिकाणी ती जागा स्वच्छ करीत त्या ठिकाणी झाडाच्या कुंडय़ा ठेवल्या आहेत. तसेच देखरेखीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.

कोपरखैरणेत उघडय़ावर कचरा टाकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने आतापर्यंत अनेक उपाय केले, मात्र नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे तीन टाकी प्रवेशद्वारनजीक संतोषी माता मैदानासमोर पूर्वीच्या कचरा कुंडीच्या जागी आता झाडांच्या कुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी येथे कचरा टाकू नयेचे फलक लावण्यात आले होते, तरीही कचरा टाकणे बंद झाले नाही. स्वच्छता कर्मचारीही ठेवण्यात आले आहेत, मात्र त्यांच्या गैरहजेरीत कचरा टाकला जात आहे. मी नागरिकांना विनंती करीत असतो, तरीही वाहनांमधून या ठिकाणी कचरा फेकला जातो, असे येथील कर्मचाऱ्याने सांगितले.

त्यामुळे या जागेवर स्वच्छता विभागाने झाडाच्या दोन कुंडय़ा ठेवल्या आहेत. तसेच ही जागा पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आली असून स्वच्छता कर्मचारी देखरेखीसाठी ठेवण्यात आला आहे. आता तरी नागरिक या ठिकाणी कचरा टाकणार नाहीत अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

कोपरखैरणेत सेक्टर ७ येथील मैदानाच्या एका कोपऱ्यात कचरा टाकला जातो. महापालिका प्रशासनाने एका दुकानदाराला सांगून त्या  ठिकाणी सीसीटीव्ही लावला. त्यातील चित्रणावरून कारवाई सुरू केली तरीही  कचरा टाकला जात आहे.

नागरिकांना विनंती आहे की रस्त्यावर कचरा टाकू नये. कचरा गोळा करणाऱ्या गाडय़ा तुमच्या दारात वेळेवर येतात. ही वेळ आम्ही नियमित सांभाळतो. नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यात मदत करावी.

-अशोक मडावी, साहाय्यक आयुक्त, महापालिका