नवी मुंबई पोलिसांनी उरणनजीक चिरले गावात देशी पिस्तूल विकणाऱ्या व विकत घेणाऱ्याला अटक केले आहे. आरोपींना १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सेराज रफिक खान (वय २४), गोविंदलाल जितराजभर (वय ३५, राहणार दोन्ही उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सेराज यांच्याकडे बेकायदा पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश तांबे मिळाली होती. तसेच तो चिरले गावातील गंगा रासोई हॉल येथे येणार असल्याचीमाहिती मिळाली होती. याच्याच आधारावर त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.

त्याने ही पिस्तूल गोविंदलाल याच्याकडून ५० हजारांना विकत घेतल्याची माहिती दिली. सेराज याच्यामार्फतच गोविंदलाल याच्यापर्यंत पोहचत पोलिसांनी त्यालाही बेडय़ा ठोकल्या. गोविंदलाल हा मूळ आजमगड येथील असून बेकायदा शस्त्र विक्रीचाच तो व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांनी दिली.