बेलापूर खाडीजवळ बेटे असल्याचा तब्बल २५ वर्षांनंतर नवी मुंबई पालिकेला पत्ता

नवी मुंबई पालिकेच्या हद्दीत बेलापूर खाडीजवळ असलेल्या दोन समुद्री बेटांचा गेल्या २५ वर्षांत पालिकेला पत्ताच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेचा नियोजन विभाग सध्या शहराचा विकास आराखडा तयार करण्याच्या कामात गुंतला आहे. गुगल आणि अ‍ॅटोकॅडचा वापर करून शहराची हद्द निश्चित करताना ही बाब आढळून आली आहे.

पालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने सप्टेंबर १९९४ नंतर टप्प्याटप्प्याने शहरातील एक नोड पालिकेला हस्तांतरित केला. त्यात बेलापूर विभागाचा पहिला क्रमांक होता. त्या वेळी सिडकोच्या ताब्यात असलेली ही दोन बेटेदेखील हस्तांतरित करण्यात आली आहेत. नवी मुंबई पालिकेचा विकास आराखडा तयार करण्याचे काम २५ वर्षांनंतर हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार हा विकास आराखडा पहिल्या २० वर्षांत तयार करणे आवश्यक होते, पण १९७६ मध्ये सिडकोने तयार केलेल्या विकास आराखडय़ावरच पालिकेचे कामकाज इतकी वर्षे सुरू होते.

मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेमुळे हा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. हे काम प्रथम एका खासगी संस्थेकडून करून घेतले जाणार होते पण पालिकेच्या नियोजन विभागावर प्रशासनाचा भरवसा नाही का, असा सवाल उपस्थित झाल्याने हे काम सध्या पालिकेचा नियोजन विभागच करीत आहे. विकास आराखडय़ाच्या या कामात बेलापूर किल्ल्याच्या दक्षिण बाजूस दोन छोटी बेटे असल्याचे आढळून आलेले आहे. सिडकोने १९७० मध्ये संपादित केलेल्या जमिनीत या बेटांचा समावेश आहे. पालिका स्थापन झाल्यानंतर या बेटांसह १०८ चौरस किलोमीटर जमीन सिडकोने पालिकेला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे ही बेटे पालिकेच्या मालकीची झाली आहेत पण पालिकेच्या मालमत्ता विभागाला याचा इतकी वर्षे पत्ताच नव्हता. चारही बाजूंनी पाणी आणि मध्येच मोकळी जमीन असलेल्या या बेटांचा अंदाजित व्यास अर्धा किलोमीटर आहे. पालिकेचा नियोजन विभाग या बेटांची माहिती आणि क्षेत्रफळ जमा करण्याच्या कामात गुंतला आहे. वाशीतील शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी पुढील महासभेत पालिकेच्या मालकीची अशी बेटे आहेत का असा खोचक सवाल केला आहे. पालिकेकडून याचे लेखी उत्तर आल्यानंतर या बेटांचा जपानप्रमाणे विकास करावा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

शहराचा विकास आराखडा तयार करत असताना सिडकोच्या मालकीची दोन बेटे बेलापूरच्या दक्षिण बाजूस आढळली आहेत. त्यांची अ‍ॅटोकॅडद्वारे माहिती घेणे सुरू असून गुगलचा उपयोग या कामी होणार आहे.    – सतीश उगीले, नगररचनाकार, नवी मुंबई पालिका