उरण: प्रवाशांनी प्रारंभीच सुसाट प्रतिसाद दिलेल्या उरण ते नेरुळ आणि बेलापूर लोकल मार्गावरील रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
उरण ते नेरुळ आणि बेलापूर मार्गावरील उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा, शेमटीखार (रांजणपाडा) या स्थानकांवर ही लोकल थांबत आहे. मात्र यातील उरण स्थानकात अनेकदा रात्री आणि भल्या पहाटे अंधार असतो त्याचवेळी फलाटावरील वीज खंडीत राहते. स्थानकात स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.
हेही वाचा… विमला तलावाची कचराकुंडी; कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे उरणमधील नागरिक त्रस्त
द्रोणागिरी स्थानक हे बोकडवीरा गावाच्या हद्दीत आणि गावा लगत असतांनाही बोकडवीरा गावातील प्रवाशांना स्थानकात जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नाही. त्यामुळे गावाच्या दिशेने मार्ग करण्याची मागणी बोकडवीरा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच हेमलता पाटील यांनी सिडकोकडे केली आहे. पुढील न्हावा शेवा (नवघर) आणि शेमटीखार (रांजणपाडा) या दोन्ही स्थानकात प्रवाशांना पायऱ्या चढून फलाटावर जावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ, महिला, लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या स्थानकात सरकत्या जिन्याचे काम अपूर्ण आहे. रेल्वे स्थानकातील असुविधांची माहिती घेऊन ती संबंधित विभागाला कळविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी दिली .
शेमटीखार नावाला गृह विभागाची परवानगी
या लोकलच्या मार्गावरील स्थानकांच्या नामविस्ताराची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. यातील रांजणपाडा ऐवजी शेमटीखार नावाला मंजुरी आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. मात्र उर्वरित उरण-कोट, द्रोणागिरी -बोकडवीरा न्हावा शेवा ऐवजी नवघर या स्थानकांच्या नावांचा निर्णय प्रलंबित आहे.