scorecardresearch

आवक वाढल्यामुळे उडीद डाळ स्वस्त

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात उडीद डाळ, हरभरा आणि तूरडाळीची आवक वाढली आहे.

आवक वाढल्यामुळे उडीद डाळ स्वस्त
उडीद डाळीचे दर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. (संग्रहित छायाचित्र)

समाधानकारक पाऊस पडल्यामुळे उत्पादनात वाढ; दर निम्म्यावर

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे कडधान्यांचे उत्पादन चांगले झाले असून वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात उडीद डाळ, हरभरा आणि तूरडाळीची आवक वाढली आहे. डाळींचे भाव उतरले आहेत. उडीद डाळीचे दर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. डाळ स्वस्त झाली असली तरीही पापड मात्र महागच राहणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात आजही अनेक ठिकाणी पापड, सांडग्यांचे वाळवण घातले जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कमी पाऊस आणि त्यामुळे वाढलेल्या डाळींच्या किमतींमुळे वाळवणात आखडता हात घ्यावा लागत होता. दोन वर्षांत किरकोळ बाजारात तूरडाळ, चणाडाळ, आणि उडीद डाळीने २०० रुपयांचा टप्पा गाठला होता. यंदा मात्र समाधानकारक पाऊस पडल्याने डाळींचे चांगले उत्पादन आले आहे. जानेवारी २०१७ मध्ये उडीद डाळीची ९८० क्विंटल आवक झाली आहे. यंदा जानेवारी २०१८ मध्ये १,६१५ क्विंटल आवक झाली आहे, आवक ६३५ क्विंटलने वाढली आहे. दरातनिम्मी घट झाली असून किरकोळीत उडीद डाळ प्रतिकिलो ६० रुपयांवर आली आहे. यामुळे दोन वर्षांनी डाळी प्रथमच स्वस्त झाल्या आहेत. गतवर्षी काळी उडीद डाळ प्रतिकिलो १००-१२० रुपयांनी उपलब्ध होती, तर पांढरी उडीद डाळ १५० रुपयांवर होती. यंदा पांढरी उडीद डाळ ६० रुपये तर काळी उडीद डाळ ५० रुपयांवर आली आहे. पांढरी उडीद पापडांसाठी तर काळी उडीद डाळ आमटीसाठी वापरतात.

पापड मात्र महागच!

उडीद डाळीच्या किमती उतरल्या असल्या तरी, उडीद डाळीपासून बनविले जाणारे पापड मात्र अद्याप महागच मिळत आहेत. तयार पापडासाठी प्रतिकिलो २०० रुपये मोजावे लागत आहेत. शहरी भागांत नोकरदार महिलांना वेळ नसल्यामुळे आणि वाळवणासाठी ऊन येईल अशी स्वच्छ मोकळी जागा मिळणे दुरापास्त झाल्यामुळे तयार पापड खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. घरीच पापड करणाऱ्या महिलांना मात्र उडीद डाळ स्वस्त झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. यंदा उडदाच्या पापडांसाठी प्रतिकिलो ८० ते १०० रुपये खर्च करावा लागेल, असे एका गृहिणीने सांगितले. एका किलोत साधारण १०० पापड होतात, तर तयार पापडांसाठी २०० रुपये मोजावे लागतात, असेही त्या म्हणाल्या.

बाजारात उडीद डाळ जरी स्वस्त झाली असली तरी पापड बनविण्यासाठी लागणारा पापड मसाला महाग आहे. त्यामुळे डाळ जरी स्वस्त झाली तरी तयार पापड स्वस्त होणार नाहीत.

– संतोष पाटील, पापड विक्रेता

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-04-2018 at 01:31 IST

संबंधित बातम्या