उरण : गाळामुळे ओहोटीच्या वेळी सातत्याने विस्कळीत होत असलेली उरण ते भाऊचा धक्का मुंबई दरम्यानची प्रवासी जलसेवा सुरळीत करण्यासाठी अखेर मोरा बंदरातील साचलेला गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. हे काम मे महिन्यात पूर्ण होईल. या कामामुळे आता ओहोटी काळात प्रवासी वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा दूर होणार आहे.
या बंदरातील गाळ हा दोन वर्षांनी काढला जात आहे. उरण ते मुंबईसाठी जलद व स्वस्त असलेल्या प्रवासासाठी या सागरी मार्गावरील वाहतुकीकडे मेरिटाइम बोर्डाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात होते. मोरा बंदरातील साचलेल्या गाळामुळे आणि इतर समस्यांमुळे उरण-भाऊचा धक्का ही अत्यंत त्रासदायक ठरू लागली आहे. त्यामुळे या मार्गावरून लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता काही हजारांवर आली आहे .
उरणच्या मोरा बंदरातून दक्षिण मुंबईत पोहोचण्यासाठी अवघा एक तास लागतो. एसटी आणि नवी मुंबईतून लोकलने प्रवास केला तरीही प्रवास खर्चासाठी प्रवाशांना ८० ते १०० रुपये मोजावेच लागतात. त्याचप्रमाणे वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण, वाहतूक कोंडी आदींचाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या जलप्रवासाला पसंती दिली जाते. मात्र दिल्या जाणाऱ्या सुविधा व गाळ न काढल्याने वाहतुकीत येणारे अडथळे यामुळे प्रवासी त्रस्त होते. आता हा गाळ काढला जात असल्याने हा प्रवास सुखकारक होणार आहे.
गाळामुळे समस्या काय?
बंदरात सातत्याने गाळ साठत असल्याने विशेषत: समुद्राच्या ओहोटीमुळे प्रवासी बोटी धक्क्याला लागत नाहीत. प्रवासी बोटी जेट्टीवर लावतानाही वेळ लागतो तर कधी कधी प्रवासी बोटी गाळात रुतून बसतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ओहोटीकाळात ठरावीक कालावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. कधी कधी तर चार-पाच दिवस वाहतूक बंद ठेवली जाते. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होते.
गाळ काढण्याच्या कामामुळे प्रवाशांना सतावणारी समस्या आता दूर होणार आहे. त्याचप्रमाणे जेट्टीच्या दुरुस्तीबाबत मुख्य कार्यालयाला कळविले आहे. त्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. -प्रभाकर पवार, निरीक्षक, मोरा बंदर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran mora port finally sludgefree uran bhau push removes obstacles water voyage amy
First published on: 13-05-2022 at 00:10 IST