उरण : गेली २३ वर्षे प्रतीक्षेत असलेल्या बेलापूर ते उरण दरम्यानच्या रेल्वेचे काम नवी मुंबईतील खारकोपपर्यंत येऊन पोचले आहे. उरणमधील या मार्गातील शेवटचे स्थानक असलेल्या उरण रेल्वे स्थानकाचे काम वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांना हा मार्ग लवकरात लवकर सुरू होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या परिसरात भरावाचे तसे स्थानकाचे खांब तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईचाच एक भाग म्हणून सिडकोकडून उरण परिसराचाही विकास केला जात आहे. त्यात येथील बेलापूर ते उरण या रेल्वे मार्गाचाही समावेश आहे. उरणमधील जेएनपीटी बंदर, तसेच बंदरावर आधारित अनेक उद्योगांमुळे नागरीकरणातही झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे एसटी, तसेच नवी मुंबईची वाहतूक व्यवस्था असलेल्या एनएमएमटीवर नागरिकांचा प्रवास अवलंबून आहे. त्यातच मागील पाच वर्षांपासून या भागातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे सुरू असल्याने प्रचंड अशा दररोजच्या वाहतूक कोंडीलाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील कामगार, कर्मचारी, विद्यार्थी तसेच व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत. ही कोंडी लवकरात लवकर दूर करण्यासाठी रेल्वेसेवा सुरू झाल्यास  दिलासा मिळेल, असे मत उरणमधील नागरिक महेश घरत यांनी व्यक्त केले आहे. उरणमधील रेल्वेची कामे सुरू असली तरी नवघर, बोकडविरा आदी गावांच्या परिसरातील स्थानकांनी स्थानिक गावांची नावे देण्याची मागणी केली जात आहे.